दमदार आवाज आणि तरुणांनाही लाजवेल अशी तडफ असलेले लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन शनिवारी ७२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. बॉलिवूडचा हा शहेनशहा आजही आधीच्याच उत्साहात, जोशात आणि आनंदात आपली कारकीर्द चमकावतो आहे. त्याचा आवाज जितका दमदार आहे, तितकेच त्याच्या प्रत्येक शब्दात, संवादात वजन असते. तो सत्तरीकडे झुकला असला तरी आजही लोकांच्या मनात त्याच्याबद्दल एकेरीच उल्लेख येतो. बॉलीवूडचा महानायक आणि शहेनशहा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ साली झाला. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील संतप्त तरूण (एंग्री यंग मॅन) अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत.
हरिवंश राय आणि तेजी बच्चन यांचा पुत्र अमिताभ बच्चन.. पित्याकडून आलेली साहित्याची आवड आणि आईकडून मिळालेली रंगभूमीची जाण याच्या जोरावर अमिताभ यांनी मुंबईची वाट धरली. राजेश खन्ना यांच्या काळात अमिताभना सिनेसृष्टीत जम बसवायला वेळ लागला. भुवन शॉ, सात हिंदुस्तानी हे त्यांच्या कारकीर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट. जंजीर, कुली, लावरिस, त्रिशूल, खून-पसीना, कालिया, अग्नीपथ, काला पथ्थर, डॉन या सगळ्या चित्रपटांमधून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण, आणि वाढती गुन्हेगारी याचे चित्रण झाले. त्यामुळे अमिताभ हिंदी चित्रपटातील एका नव्या प्रवाहाला निमित्त ठरले. चुपके-चुपके, नमक-हलाल, मिलीसारखे वेगळे सिनेमाही त्यांनी केले. तर ‘सिलसिला’, ‘कभी-कभी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ अशा सिनेमांमधून प्रेमाची नवी परिभाषाच अमिताभ यांनी बॉलिवूडला दिली. सात हिंदुस्तानी चित्रपटाने त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.

बॉलीवूड महानायकाच्या कारकिर्दीवर एक झलक
आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेवर निवडून गेले होते.

आपल्या लाडक्या महानायकाला खालील प्रतिक्रीया बॉक्समध्ये शुभेच्छा द्या आणि तुम्हाला आवडलेली त्यांची भूमिकासुद्धा त्यात नमूद करण्यास विसरु नका.