कुटुंबामध्ये कितीही वाद असले, एकमेकांच्या मनात दुरावा असला तरीही दु:ख आणि संकटांच्या प्रसंगी मात्र हे सर्व रागरुसवे कुठच्या कुठे पळून जातात. मुळात अशा प्रसंगामध्येच नात्यांची खरी परीक्षा असते असं म्हणायला हरकत नाही. सध्या बॉलिवूडमधील कपूर कुटुंब अशाच परिस्थितीचा सामना करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर एक आघातच झाला. पती बोनी कपूर आणि मुली जान्हवी, खुशी यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. अशा प्रसंगी कलाविश्वापासून ते अगदी चाहत्यांपर्यंत सर्वांनीच त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीची मुलं म्हणजेच, अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहिण अंशुलासुद्धा मागे नव्हते.

आपल्या आईपासून वेगळं होऊन वडिलांनी श्रीदेवी यांच्यासोबत लग्न केल्यामुळे सुरुवातीपासून अर्जुनचं त्यांच्याविषयी फार चांगलं मत नव्हतं. त्यांच्या नात्यात काही गोष्टींचा पेच होताच. पण, श्रीदेवी यांच्या निधनानंतर मात्र अर्जुन आणि अंशुला या दोघांनीही आपली जबाबदारी ओळखत जान्हवी आणि खुशीला आधार देत त्यांचं आयुष्य पूर्वपदावर आणण्यास हातभार लावला. सध्या अर्जुन मोठ्या भावाची भूमिका चोखपणे बजावत असून, तो जास्तीत जास्त वेळ जान्हवी आणि खुशीसोबत व्यतीत करत असल्याच्या चर्चा आहेत. इतकंच नव्हे, तर या परिस्थितीत तो आपल्या वडिलांना म्हणजेच बोनी कपूर यांना पावलोपावली साथ देत आहे.

वाचा : प्रिय आईस.. तू माझं सर्वस्व होतीस, जान्हवी कपूरने जागवल्या श्रीदेवींच्या आठवणी

‘डेक्कन क्रोनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अर्जुन आपल्या वडिलांच्या घरीच स्थायिक होण्याच्या विचारात आहे. आतापर्यंत तो आणि अंशुला वडिलांपासून आणि सावत्र बहिणींपासून वेगळे राहात होते. पण, सध्याची परिस्थिती पाहता आपल्या वडिलांना आणि बहिणींना आधाराची गरज असल्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. अर्जुन त्याच्या सख्ख्या बहिणीच्या म्हणजेच अंशुलाच्या बाबतीत जितका जबाबदारपणे वागतो, तितकीच त्याला जान्हवी आणि खुशीचीदेखील काळजी वाटत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कपूर कुटुंबात नाती नव्याने आकारास येत आहेत असंच म्हणावं लागेल.