दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतला त्याच्या राहत्या घरात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. रजनीकांतने तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस बॉम्ब शोध पथक घेऊन रजनीकांतच्या घरी पोहोचले. मात्र, तपासणी अंती कुठल्याही प्रकारचा बॉम्ब अथवा स्फोटक आढळून आले नाही.

‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार रजनीकांतला एका वेगळ्या नंबरवरुन फोन आला होता. फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीने रजनीकांतला त्याच्या राहत्या घरात Poes Garden येथे बॉम्ब असल्याची धमकी दिली. त्यानंतर चेन्नईतील पोलीस श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक घेऊन रजनीकांतच्या घराची तपासणी करु लागले. दरम्यान ही गोष्ट चाहत्यांना कळताच त्यांनी रजनीकांतच्या घराबाहेर गर्दी केली.

पोलिसांनी तपासणी केल्यानंतर तेथे बॉम्ब किंवा इतर कोणत्याही प्रकारचे स्फोटक अढळून आलेले नाहीत. रजनीकांतला कोणी फोन करुन धमकी दिली होती याचा तपास सध्या पोलीस घेत आहे. असे पहिल्यांदाच झालेले नाही तर अनेक वेळा सेलिब्रिटींना अशा खोट्या धमक्या येतच असतात.