News Flash

बॉम्बे वेलवेट: प्रेक्षणीय, पण गुंतागुंतीचा

आजच्या मुंबईप्रमाणेच पन्नास-साठच्या दशकातील मुंबई नव्याने वसत असतानाच काळ, त्यातील हितसंबंध, घोटाळे, राजकारणी-गुन्हेगार यांची हातमिळवणी यावर या सिनेमात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

| May 17, 2015 12:23 pm

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे चित्रपट नेहमीच वैविध्यपूर्ण विषयांचे आणि भाष्य करणारे असतात म्हणून त्यांच्या चित्रपटांचा विशिष्ट प्रेक्षकवर्गही असतो. परंतु, ‘बॉम्बे वेलवेट’ पाहून या प्रेक्षक वर्गाची थोडीशी निराशाच होईल. साठच्या दशकातील मुंबईचे अप्रतिम चित्रण करतानाच इंग्रजी पुस्तकावर बेतलेला सिनेमा rv08करताना  लेखन-संवाद याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तद्दन गल्लाभरू सिनेमांसारखाच ‘बॉम्बे वेलवेट’ हा सिनेमा संपतो. उत्कंठावर्धक शेवट दाखवू शकत नाही. सिनेमा वाईट नसला तरी प्रेक्षक  तल्लीन व्हावा असा नक्कीच नाही. हा सिनेमा प्रेक्षकाला काही अंशी सुन्न करणारा अनुभव देतो खरा. परंतु, गुंतागुंतीची प्रसंग, रचना, काळ्या रंगाचा अधिक वापर, प्रभावी संवादांचा अभाव, व्यक्तिरेखांची गुंतागुंतीची मांडणी आणि अनुत्सुक शेवट यामुळे प्रेक्षकांवर सिनेमाचा खोलवर परिणाम होत नाही.
१९६० च्या दशकातील मुंबईतल्या गुन्हेगारी जगतात प्रवेश केलेले बलराज आणि त्याचा मित्र चिम्मन यांना झटपट गर्भश्रीमंत बनायचे आहे. तत्कालीन मुंबईतल्या उच्चभ्रू धनिकांच्या वर्तुळात वावरायची बलराज, चिम्मन यांची तीव्र इच्छा आहे. या वर्तुळात पोहोचण्यासाठी ते गुन्हेगारी स्वरूपाचे काहीही करायला तयार आहेत. एकदा एकाला लुटत असताना बलराजला कैझाद खंबाटा भेटतो आणि तो बलराजला बॉम्बे वेलवेट या जॅझ बारचा मॅनेजर करतो आणि अचानकपणे बलराज, चिम्मन दोघेही उच्चभ्रू इंग्रजी बोलणाऱ्या, इंग्रजी मद्यसेवन करणाऱ्या अशा तथाकथित उच्चभ्रू  गुन्हेगारी जगतात प्रवेश करतात. बलराजला आपल्या स्वार्थासाठी वापरून घ्यायचे कैझाद ठरवितो आणि जॉनी बलराज असे त्याला नवे नाव देतो. जॅझ बारमधील रोझी ही गायिका जॉनी बलराजला भेटते आणि जॉनी तिच्या प्रेमात पडतो. त्यांच्या प्रेमप्रकरणाला अखंड सिनेमात असलेली तथाकथित उच्चभ्रू लोकांची लबाडी, कारस्थाने यांची पाश्र्वभूमी दिग्दर्शकाने दिली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी स्वत:च्या बायकोचाही निर्लज्जपणे वापर करणारा कैझाद खंबाटा हा भांडवलशाहीचा प्रतिनिधी आहे, तर छुपेपणाने वावरणारा परंतु लोकांसमोर दाखवायला एका वृत्तपत्राचा संपादक असलेला जिमी मेस्त्री आहे. जिमी आणि कैझाद यांचे एकमेकांशी वैर आहे. म्हणून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या स्पर्धेत दोघेही रोझी आणि जॉनी बलराज तसेच चिम्मन यांचा वापर करू पाहताहेत. तसेच दोघेही रोझी-जॉनी यांचे प्रेम अयशस्वी कसे होईल यासाठी प्रयत्न करतात. रोझी-जॉनी यांचे प्रेम दाखवतानाच दिग्दर्शकाने तथाकथित उच्चभ्रूंची अधिक श्रीमंत बनण्यासाठीची हाव, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी, मुंबईतील मिल मालक, त्यांचे गुन्हेगारी जगताशी-राजकारण्यांशी असलेले संबंध यातून मुंबई  शहरातील जमिनींचा विकास, त्यासाठी समुद्रात भराव घालून उभारणी करण्याचे प्रयत्न असे पन्नास-साठच्या दशकातील मुंबईचे दर्शन घडविण्याचा चांगला प्रयत्न चित्रपटकर्त्यांनी केला आहे.
आजच्या घडीला बांधकाम व्यावसायिक-विकासक- राजकारणी-गुन्हेगारी यांचे घनिष्ट संबंध आहेत हे सर्वसामान्यांना दररोज वर्तमानपत्रांतून समजते. आजच्या मुंबईप्रमाणेच पन्नास-साठच्या दशकातील मुंबई नव्याने वसत असतानाच काळ, त्यातील हितसंबंध, घोटाळे, राजकारणी-गुन्हेगार यांची हातमिळवणी यावर या सिनेमात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जॉनी बलराजच्या भूमिकेतील रणबीर कपूर आणि जॅझ गायिका रोझीच्या भूमिकेतील अनुष्का शर्मा यांनी बाजी मारली आहे. कैझाद खंबाटाच्या भूमिकेत करण जोहरने प्रथमच रूपेरी पडद्यावर अभिनय केला आहे. सिनेमाचे कथानक वेगवान असले तरी मध्यांतरानंतर खूप उत्कंठा प्रेक्षकाला वाटेल अशी मांडणी करण्यात दिग्दर्शकाला अपयश आले आहे. शेवटाकडे जाताना प्रेक्षक अनुत्सुकतेने सिनेमा पाहत राहतो.  
जॉनी बलराज आणि रोझी या दोघांच्याही आयुष्याला असलेली गडद दु:खाची झालर, जॉनीचे कृत्रिम हसणे, त्यातून दिसणारे त्याच्या मनातील शल्य, रोझी गाताना तिच्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरून केलेली rv01केशरचना, पाश्र्वभूमीला पडद्यावर दिसणारे रंग, जॉनी-रोझीच्या अनेक भेटींच्या पाश्र्वभूमीला पडद्यावर दिसणारे गडद रंग यातून विषण्णतेचा अनुभव प्रेक्षकाला मिळतो.
कला दिग्दर्शन, संगीत आणि छायालेखन व संकलन या विभागांची कामगिरी झकास आहे. परंतु, मुळात अकाल्पनिक पुस्तकावर आधारित सिनेमा करताना कथानकातील व्यक्तिरेखांची उत्कंठावर्धक मांडणी करून प्रसंगांची रचना प्रभावी पद्धतीने करण्यात सिनेमा कमी पडला आहे. मात्र जुन्या मुंबईतील ट्राम, बसगाडय़ा, मोटारगाडय़ा यांचे दर्शन उत्तम पद्धतीने घडविण्याबरोबरच त्या काळानुरूप संगीत यामुळे सिनेमा प्रेक्षणीय ठरतो. परंतु, प्रेक्षक तल्लीन होऊ शकत नाही.

बॉम्बे वेलवेट
निर्माते – विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल
दिग्दर्शक – अनुराग कश्यप
लेखक – वासन बाला, ग्यान प्रकाश, अनुराग कश्यप, एस. थानिकाचलम
संगीतकार – अमित त्रिवेदी
छायालेखक – राजीव रवी
संकलक – प्रेरणा सैगल, थेल्मा शूनमेकर
कला दिग्दर्शक – समीर सावंत
कलावंत – रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, करण जोहर, के के मेनन, मनीष चौधरी, संदेश जाधव, सिद्धार्थ बसू, रेमो फर्नाडिस, सत्यदीप मिश्रा, विवान शहा, जगदीश राजपुरोहित, शांती, मुकेश छाब्रा, वरुण ग्रोव्हर व अन्य.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 12:23 pm

Web Title: bombay velvet review ranbir anushka shine only occasionally
Next Stories
1 भरकटलेले युद्ध
2 कतरिनाची ‘कान’वारी
3 ‘गोष्ट तशी गमतीची’चा कृतज्ञता व आनंद सोहळा
Just Now!
X