22 November 2019

News Flash

जेम्स बॉण्ड बॉम्ब स्फोटात जखमी

जेम्स बॉण्ड ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता डेनियल क्रेग एका बॉम्ब स्फोटात जखमी झाला आहे.

‘माय नेम इज बॉण्ड.. जेम्स बॉण्ड!’ सर इयान फ्लेमिंग यांच्या लेखणीतून निर्माण झालेले हे करिश्माई वाक्य आपल्या अनोख्या शैलीत उच्चारणारा जेम्स बॉण्ड गेली ६० वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखेंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जेम्स बॉण्डने आपल्या अचाट कर्तृत्वाच्या जोरावर आजवर शेकडो वेळा युरोपियन देशांचे संरक्षण केले आहे. दरम्यान अनेकदा त्याला मृत्यृशी झूंज द्यावी लागली. असाच काहीसा प्रसंग त्याच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडला आहे. जेम्स बॉण्ड ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता डेनियल क्रेग एका बॉम्ब स्फोटात जखमी झाला आहे.

जेम्स बॉण्ड मालिकेतील अगामी चित्रपट बॉण्ड २५ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तीन बॉम्ब स्फोट झाले यातील एका स्फोटात डेनियल क्रेग व काही सहकलाकार जखमी झाले.

ब्रिटिश गुप्तहेर जेम्स बॉण्ड हा अ‍ॅक्शन स्टार म्हणून लोकप्रिय आहे. त्यामुळे बॉण्डपटांमध्ये आपल्याला भरपूर अ‍ॅक्शन सीन पहायला मिळतात. असेच काही अ‍ॅक्शन सीन चित्रित करण्यासाठी दिग्दर्शकांमार्फत काही बॉम्ब स्फोट घडवण्याची योजना आखली गेली. या स्फोटांचा उद्देश केवळ चित्रपटाचे चित्रीकरण एवढाच होता. त्यामुळे यात वापरल्या जाणाऱ्या विस्फोटकांची क्षमता फार कमी होती. परंतु प्रत्यक्ष चित्रीकरणादरम्यान काही तांत्रिक बिघाड झाले. आणि तीन बॉम्ब एकाच वेळी फुटले. परिणामी एक मोठा विस्फोट झाला. या विस्फोटात अभिनेता डॅनियन क्रेग व काही सहकलाकार जखमी झाले. त्यानंतर डॅनियल व इतर कलाकारांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या या सर्व जखमींची प्रकृती व्यवस्थित आहे. या स्फोटात कलाकार जखमी झालेच शिवाय महागडे कॅमेरे, काही तांत्रिक उपकरणे व संपूर्ण स्टुडिओचे नुकसान झाले. परिणामी निर्मात्यांना लाखो डॉलर्सचा फटका बसला आहे.

बॉण्ड २५ हा जेम्स बॉण्ड मालिकेतील २५वा चित्रपट आहे. आजवरचा सर्वात महागडा बॉण्डपट म्हणून चर्चेत असलेल्या या चित्रपटासाठी अभिनेता डॅनियल क्रेगला तब्बल ४५० कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले. या चित्रपटाची कथा रेमंड बेन्सन यांच्या नेव्हर ड्रिम ऑफ डाइंग या कादंबरीवर आधारित आहे. २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कॅरी जोजी फुकुनागावर सोपवण्यात आली आहे.

First Published on June 15, 2019 11:36 pm

Web Title: bond 25 james bond mpg 94
Just Now!
X