‘जेम्स बॉण्ड’पटाचा नवा अध्याय भारतात प्रदर्शनाच्या तयारीत असताना सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील बहुचर्चित चुंबनदृश्यासह इतर चार दृश्यांवर कात्री चालविली असल्याने ट्विटरवरून टीकेची झोड उठली आहे. सेन्सॉर प्रमाणित आवृत्तीचे ‘संस्कारी जेम्स बॉण्ड’ असे नामकरणही करण्यात आले आहे.

‘स्पेक्टर’ या बॉण्डपटाला ‘यू/ए’ प्रमाणपत्र देण्यात येऊनही चित्रपटातील चार दृश्यांना आणि काही संवादांना कात्री लावली आहे. चित्रपटात अश्लील शब्द किंवा दृश्ये असल्यास ते काढून टाकावेत, असे स्पष्ट आदेश याआधीही सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिले होते. मात्र, त्यावरून सगळीकडून टीका झाल्यानंतर निहलानींनी हे आदेश मागे घेतले होते. तरीही ‘स्पेक्टर’ला निहलानी शैलीत कात्री लावण्यात आली असल्याबद्दल टीका होते आहे. ‘स्पेक्टर’मधील चुंबनदृश्ये, काही संवाद फारच उत्तेजक असल्याचे कारण देत बोर्डाने या दृश्यांवर कात्री मारली आहे. यात डॅनियल क्रेग आणि मोनिका बेलूची यांच्या चुंबनदृश्याबरोबरच चित्रपटातील दुसरी नायिका लिया सैदू हिच्याबरोबरचे चुंबनदृश्यही कापण्यात आले आहे.
कोणताही चित्रपट सेन्सॉर बोर्डाचा कारभार हा निहलानींच्या मतानुसारच चालतो. ते त्यांच्या विचारांनुसारच चित्रपटाची कापाकापी करून वाट लावतात, अशी टीका बोर्डाचे सदस्य अशोक पंडित यांनी केली आहे. तर सेन्सॉर बोर्डाच्या कृपेमुळे पहिल्यांदाच बॉण्डच्या नायिकांनी आपली बेअब्रू वाचवल्याबद्दल सुटकेचा श्वास सोडला असेल, अशी चेष्टा दिग्दर्शक शिरीष कुंदेर यांनी केली आहे. ‘संस्कारी जेम्स बॉण्ड’ या हॅशटॅगवरही प्रतिक्रियांचा पूर आला आहे. ‘स्पेक्टर’ हा सूरज बडजात्यांनी दिग्दर्शित केला तरच तो भारतात कुठल्याही कटविना प्रदर्शित होऊ शकेल, अशी थेट टीकाही निहलानी आणि सेन्सॉर बोर्डावर करण्यात आली आहे.