एखाद्या चित्रपटाच्या कथेवरून मालिकेची निर्मिती होण्याची कित्येक उदाहणे आपल्याकडे आहेत. पण एका न बनलेल्या चित्रपटाच्या कथेवरून मालिकेची निर्मिती करण्याचा घाट ‘कलर्स’ वाहिनीवरील नवीन ‘उडान’ मालिके च्या निमित्ताने घालण्यात आला आहे. या मालिकेमागची मूळ संकल्पना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या १९९२ साली अर्धवट राहिलेल्या ‘गिरवी’ या सिनेमावर आधारित आहे. महेश भट्ट यांनी नेहमीच आपल्या चित्रपटांमधून प्रखर सामाजिक भाष्य केले आहे. त्यामुळे ‘उडान’वरही त्यांचा प्रभाव दिसून येईल, असा वाहिनीचा दावा आहे.
‘उडान’ची सुरुवातच महेश भट्ट यांच्यापासून होते. त्यामुळे त्यांनी या मालिकेमागचा विचार सांगताना ‘गिरवी’ या आपल्या अर्धवट राहिलेल्या चित्रपटाचा किस्सा सांगितला. ‘१९९२ साली मी एका मासिकामध्ये वेठबिगार मजुरांबद्दलचा एक लेख वाचला होता. त्यात आपल्या वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देण्यापुरतेही पैसे जवळ नसलेल्या एका इसमाने आपल्या न जन्मलेल्या मुलीला गहाण ठेवल्याचा उल्लेख होता. ती कथा मला खूप भावली आणि त्या कथेवर त्यावेळी अजय देवगणला घेऊन ‘गिरवी’ हा चित्रपट करण्याचे मी ठरवले होते. पण निर्मात्याला हा विषय आर्ट सिनेमाचा वाटला आणि त्याने या कथेमध्ये रुची दाखवली नाही’, असे त्यांनी सांगितले. ‘उडान’ मालिकेचे निर्माते गुरुनाथ भल्ला हे त्यावेळी माझ्याकडे साहाय्यक म्हणून काम करत होते. आज इतक्या वर्षांनंतर त्यांनी माझ्याकडे या विषयावर मालिका करण्याविष़ी विचारले. मात्र मालिका करताना त्यांनी हीच कथा एका पित्याच्या नजरेने न पाहता त्या छोटय़ा मुलीच्या नजरेतून रंगवण्याची कल्पना मांडली. त्यांची ही कल्पनासुद्धा आपल्याला भावली आणि म्हणून मालिकेसाठी आपण परवानगी दिल्याचे भट्ट यांनी यावेळी बोलताना सांगितले.
 ‘उडान’ची कथा एका छोटय़ा मुलीची आहे. आपल्या वेठबिगारी बापाला मरणानंतर तरी मुक्ती मिळावी म्हणून या छोटय़ा मुलीचा बाप तिच्या जन्माआधीच तिला गावच्या जमीनदाराकडे गहाण ठेवतो. पण त्या मुलीचे मन या गुलामगिरीत रमत नाही. मग स्वत:ला आणि पर्यायाने गावातील सर्व वेठबिगारांना या प्रथेतून मुक्त करण्यासाठी तिने केलेली धडपड अशी या मालिकेची कथा गुंफण्यात आली आहे, असे गुरुनाथ भल्ला यांनी सांगितले. एकीकडे आपण नुकताच देशाचा ६८ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. आणि लगेचच दोन दिवसांनी अजूनही एका अर्थाने पारतंत्र्यात असलेल्या भारतीयांची कथा सांगणारी ‘उडान’ सारखी मालिका प्रसारित होते आहे हा योगायोग नक्कीच नाही, हेही भल्ला यांनी यावेळी स्पष्ट के ले. भट्ट यांची मूळ कथा १९९२ सालची आहे, पण आजच्या काळातही ते वास्तव आहे आणि म्हणूनच आपल्याला १५ ऑगस्टला मालिका प्रदर्शित करायची होती, असे भल्ला यांनी सांगितले. वेठबिगारीसारखी प्रथा ही आजही आपल्या देशातले भीषण वास्तव आहे. आणि आपण या वास्तवाबद्दल अनभिज्ञ आहोत. उलट १९९२च्या तुलनेत आज हा प्रश्न जास्त गंभीर झाला आहे. २०११ आणि २०१३ ची वेठबिगार कामगारांची संख्या जास्त होती आणि हे धक्कादायक आहे. आज शहरातील लोकांना असे काही होत आहे याची सुतराम कल्पना नाही, हे प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधल्यावर आम्हाला लक्षात आले. या विषयाची गंभीरपणे दखल घेण्यासाठी आम्हाला या विषयाची व्याप्ती वाढवणे गरजेचे वाटले आणि म्हणूनच मालिकेच्या रूपाने हा विषय घरोघर पोहोचवण्याचा निर्णय घेण्याचे भल्ला यांनी यावेळी सांगितले.