हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा आयफा पुरस्कार सोहळा नुकताच बँकॉकमध्ये पार पडला. आयफाच्या १९ व्या सोहळ्यामध्ये अनेक सेलिब्रेटीज उपस्थित असल्यामुळे या सोहळ्याला जणू सारे तारेच जमिनीवर अवतरल्याचा भास निर्माण झाला होता. विशेष म्हणजे यंदाचा सोहळा खास ठरला असून या सोहळ्याच्या निमित्ताने तब्बल २० वर्षानंतर ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी ‘सलाम -ए -इश्क’ या गाण्यावर ठेका धरला आणि उपस्थित सा-यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळवून ठेवल्या. मात्र या आनंदाच्या क्षणामध्ये उपस्थित सा-यांनाच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची उणीव भासत होती. यामुळेच नकळतपणे बोनी कपूर यांनीही श्रीदेवीच्या आठवणीने गहिवरुन आले.

नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यामध्ये श्रीदेवी यांच्या ‘मॉम’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र त्यांच्या अचानक निधनामुळे हा पुरस्कार घेण्यासाठी त्यांच्या पतीला अर्थात बोनी कपूर यांनी आयफा पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावावी लागली.

#iifa2018 #bangkok #arjunkapoor with his #father @arjunkapoor

A post shared by ForeverArjun (@foreverarjun26) on

श्रीदेवी यांना प्रदान होणा-या पुरस्काराची घोषणा करताच बोनी कपूर प्रचंड भावूक झाले. इतकंच नाही तर पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू नकळतपणे त्यांच्या गालावर ओघळले. मात्र त्यांच्या या परिस्थितीमध्ये त्यांना मुलगा अर्जुन कपूर याने सावरुन घेतल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, बोनी कपूर यांची ही अवस्था पाहताच त्यांचा भाऊ अनिल कपूर हादेखील त्यांना दिलासा देण्यासाठी पुढे आला. एकंदरीत श्रीदेवी यांच्या जाण्याने बोनी कपूर यांची झालेली अवस्था पाहता उपस्थित सा-याच्याच कडा पाणावल्याचे दिसून आले.

श्रीदेवी यांनी ‘मॉम’ चित्रपटात केलेल्या भूमिकेमुळे त्यांना यापूर्वीही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारतानादेखील बोनी कपूर यांची अशीच अवस्था झाली होती. मात्र त्यावेळी त्यांना मुलगी जान्हवी कपूर हिने सावरले होते.