निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांनी अभिनेत्री प्रिया वारियरचा आगामी ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटावर आक्षेप घेतला असून दिग्दर्शकांना नोटीस बजावली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. एका अभिनेत्रीचा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला असून टीझरच्या शेवटी त्या अभिनेत्रीचा बाथटबमध्ये मृत्यू होतो. बोनी कपूर यांच्या पत्नी आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचाही दुबईत बाथटबमधील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. बोनी कपूर यांनी यावर आक्षेप घेतला असून कायदेशीर नोटीस बजावली होती. आता बोनी कपूर हे या चित्रपटाच्या शिर्षकामध्ये श्रीदेवी यांचा उल्लेख केला असल्याने चित्रपट निर्मात्यांच्या विरोधात पुन्हा कारवाई करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाशी संबंधीत सर्वांवर बोनी कपूर चिडले आहेत. चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहून बोनी कपूर यांनी चित्रपटावर आक्षेप घेत दिग्दर्शकांना नोटीस बजावली होती. पंरतु चित्रपट निर्मात्यांनी या नोटीसकडे फारसे लक्ष दिले नाही. आता बोनी कपूर यांनी चित्रपटाच्या शिर्षकामध्ये श्रीदेवी यांचे नाव वापरल्याचा आरोप करत निर्मात्यांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आपल्याला हव्या त्या व्यक्तीवर चित्रपट काढण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. पण एखाद्या व्यक्तिच्या नावाचा वापर ते चित्रपटासाठी करु शकत नाहीत’ असे म्हटले आहे.

बोनी कपूर यांची नोटीस मिळल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत माम्बुलीने ‘बोनी कपूर यांच्याकडून नोटीस मिळाली असून त्या नोटीशीला कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. माझा चित्रपट एक सस्पेंस थ्रिलर आहे. श्रीदेवी हे कोणाचेही नाव असू शकते आणि माझ्या चित्रपटातील मुख्य पात्राचे ते नाव आहे’ असे ते म्हणाले आहेत. दरम्यान प्रिया प्रकाशच्या वडिलांनी कायदेशीर नोटीसबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. हा आमचा नाही तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा प्रश्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आगामी ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटातून प्रिया वारियर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.