23 July 2019

News Flash

Book My Show वरून तिकीट बुक करत असाल तर हे वाचाच!

तिकीटाच्या मूळ किंमतीपेक्षा काही रुपये अधिक आकारले जातात.

सिनेमाचं तिकीट बुक करण्यासाठी आजकाल थिएटरच्या काऊंटरवर रांग लावावी लागत नाही. मोबाइल अॅप, वेबसाइट किंवा ‘बुक माय शो’वरून सहज हे तिकीट बुक करता येतं. पण त्यासाठी तिकीटाच्या मूळ किंमतीपेक्षा काही रुपये अधिक आकारले जातात. हे पैसे इंटरनेट हँडलिंग फी म्हणून घेतले जातात. पण ग्राहकांकडून इंटरनेट हँडलिंग फी उकळण्याचा अधिकार चित्रपट तिकिटांचं ऑनलाइन बुकींग करणाऱ्या प्लॅटफॉर्मना नाही, असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.

‘फोरम अगेन्स्ट करप्शन’चे अध्यक्ष विजय गोपाल यांनी बुक माय शो, पीव्हीआरविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली आहे. माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त फी आकारणं हे आरबीआयच्या व्यापारी सवलत दर (मर्चंट डिस्काऊंट रेट- MDR) नियमांचं उल्लंघन असल्याचं नमूद केलं आहे.

सिनेमाचं तिकीट बुक करताना मूळ रक्कम जर दोनशे रुपये असेल, तर इंटरनेट हँडलिंग फीमुळे ही रक्कम २३० रुपयांपर्यंत जाते. फक्त तिकीट बुक करणारे अॅप्सच नाही तर फूड डिलीव्हरी आणि कॅब सर्व्हिस अॅप्ससुद्धा अशाप्रकारचे इंटरनेट हँडलिंग फी आकारतात, असं विजय गोपाल म्हणाले. नागरिकांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे.

व्यापारी सवलत दर (MDR) म्हणजे काय?

क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे स्वीकारल्याबद्दल व्यापारी बँकेला जी रक्कम देतात, तिला व्यापारी सवलत दर म्हणतात. ही रक्कम व्यापारी किंवा दुकानदारांनी भरायची असल्याने सामान्य ग्राहकांना त्याचा भुर्दंड सोसावा लागू नये. त्यामुळे ग्राहकांकडून इंटरनेट फी आकारणं अवैध असल्याचं म्हटलं आहे.

First Published on March 15, 2019 1:15 pm

Web Title: book my show does not have authority to charge internet handling fee rti