‘मासूम’ चित्रपटातील ‘लकडी की काठी’ असो वा ‘जंगल जंगल पता चला है..’सारखे ‘जंगलबुक’ या सचेतपट मालिकेचे शीर्षकगीत.. गुलजारांनी मुलांच्या भावविश्वाचे नेमके वर्णन केले आहे. आपल्या हृदयस्पर्शी लेखनप्रतिभेने वाचकांच्या थेट अंतर्मनाशी संवाद साधणाऱ्या या प्रतिभावंताने चित्रपट आणि मालिकांव्यतिरिक्त खास मुलांसाठी विपुल लेखन केले आहे. ‘बोस्कीच्या गोष्टी’ या मालिकेच्या रूपाने त्यांची नऊ पुस्तके ग्रंथाली प्रकाशन संस्थेने आता मराठीत उपलब्ध करून दिली आहेत. येत्या मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी दस्तुरखुद्द गुलजार यांच्या उपस्थितीत या पुस्तक संचाचे प्रकाशन होणार आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने गुलजार ठाण्यातील मुलांशी थेट संवादही साधणार आहेत.
जुन्या-नव्या पिढीतील विविध लेखकांनी ही पुस्तके अनुवादित केली आहेत. त्यात बोस्की (उषा मेहता), बोस्कीची गिनती (अंबरीश मिश्र), बोस्कीचा जंगलनामा (किशोर मेढे), बोस्कीची सुनाली (अमृता सुभाष), बोस्कीचे अजबगजब धनवान (अमृता सुभाष), बोस्कीचे पंचतंत्र (सविता दामले), बोस्कीचे तळ पाताळ(मधुकर धर्मापुरीकर), बोस्कीच्या गप्पागोष्टी (मधुकर धर्मापुरीकर) आणि कॅप्टनकाका (विजय पाडळकर) हा पुस्तकांचा समावेश आहे.
मंगळवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या या प्रकाशन समारंभास ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र, लेखक अरुण शेवते आणि ठाण्यातील कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. प्रदीप उप्पल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष आणि दिग्दर्शक संदेश कुलकर्णी या समारंभात पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे अभिवाचन करणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 9, 2015 6:21 am