पाताल लोक ही अॅमेझॉन प्राइमवर सध्या चांगलीच गाजते आहे. अनुष्का शर्मा ही या वेबसीरिजची निर्माती आहे. पाताल लोकची तुलना अनेकजण नेटफ्लिक्सवर गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजशीही करत आहेत. याबाबत अनुष्काला विचारलं असता अनुष्का म्हणते की ‘पाताल लोक’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ दोन्ही सीरिज या वेगळ्या आणि आपल्या जागी उत्तम आहेत. PINKVILLA ला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं अनुष्काने काय म्हटलं आहे?
“जेव्हा एखादी वेबसीरिज येते तेव्हा लोक आधी आलेल्या वेबसीरिजशी तिची तुलना करतात. हे अनेकदा घडलं आहे. पाताल लोक ही सीरिज आली तेव्हा लोकांनी या सीरिजी तुलना सेक्रेड गेम्ससोबत केली. मात्र या दोन्ही सीरिज आपल्या पातळीवर वेगळ्या आणि उत्तम आहेत. सध्याच्या घडीला OTT प्लॅटफॉर्मवर अनेक वेगळ्या धाटणीच्या कथा असलेल्या सीरिज येत आहेत ही गोष्टही चांगली आहे. लोक जेव्हा एक सीरिज बघतात तेव्हा साहजिकच त्या सीरिजशी तुलना आधी आलेल्या सीरीजशी करतात. तुलना करणं हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळेच पाताल लोक आणि सेक्रेड गेम्स यांची तुलना लोकांनी केली. मात्र या दोन्ही सीरिज वेगळ्या आणि आपल्या जागी उत्तम आहेत” असं अनुष्काने म्हटलं आहे.

पाताल लोक ही वेबसीरिज मात्र अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. एवढंच नाही तर अनुराग कश्यप, विराट कोहली, अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग यांच्यासह अनेक कलाकारांनी या वेबसीरिजवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जयदीपसिंग अहलावत या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तर नीरज काबी, स्वस्तिका मुखर्जी, अभिषेक बॅनर्जी यांच्याही या वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. यााधी नेटफ्लिक्सवर आलेल्या सेक्रेड गेम्स या सीरिजलाही चांगलीच प्रसिद्धी जगभरात मिळाली होती.