आमच्याकडे अगदी साग्रसंगीत दिवाळी साजरी केली जाते. नरक चतुर्थी दिवशी पहिली आंघोळ केल्यावर कारेट फोडलं जातं. त्यानंतर मी माझा नवरा आदिनाथला उटणं लावून आंघोळी घातली. विशेष म्हणजे आमच्याकडे बेक करंज्या केल्या जातात. या करंज्यांमध्ये दुधी हलव्याचं सारण भरुन मग त्या बेक केल्या जातात. ही आमच्या कोठारे कुटुंबाची परंपराचं आहे. कामात व्यस्त असल्यामुळे मला फराळ करायला वेळ मिळत नाही पण मला खायला खूप आवडतं. पण सध्या चित्रपटाचं शूटींग सुरु असल्यामुळे माझ डायट चालू आहे आणि त्यामुळेचं मला खाण्यावर नियंत्रण ठेवावं लागतयं.
यंदाची दिवाळी खरं तर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. नेहमी मी माझ्या एका फॅमिलीसोबत हा सण साजरा करते पण यावेळी माझ्या दुसऱ्या फॅमिलीबरोबर हा सण साजरा करणार आहे. ती दुसरी फॅमिली म्हणजे गुरु सिनेमाची संपूर्ण टीम. येत्या २०१६ वर्षाच्या सुरवातीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी आणि आदिनाथ दरवर्षी घरच्यांसाठी काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करतो. यंदा मला ‘गुरु’ ने स्पेशल गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे ही दिवाळी माझ्यासाठी स्पेशल राहील.
शब्दांकन- चैताली गुरव