गेल्या वर्षात म्हणजेच २०१७ मध्ये विविध धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले खरे. पण, या चित्रपटांचे विषय आणि एकंदर बॉक्स ऑफिसच्या कमाईचे आकडे पाहता बॉलिवूड चित्रपटांना अपेक्षित यश मिळाले नाही असेच चित्र पाहायला मिळाले. तगडी स्टारकास्ट असलेल्या काही चित्रपटांनाही यंदाच्या वर्षात अपयशाचा सामना करावा लागला. पण, वर्षअखेरीस प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी मात्र कुठेतरी बॉक्स ऑफिस कमाईची गणितं बदलली.

यामध्ये अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने बाजी मारली असून, २०१७ या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये ‘टायगर…’ अग्रस्थानी पोहोचला आहे. जागतिक पातळीवरही सलमानच्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे लक्ष वेधत असून आमिरच्या ‘३ इडियट्स’ या चित्रपटाला ‘टायगर’ने पिछाडले आहे. ४२३.५९ कोटींची घसघशीत कमाई करणारा ‘टायगर जिंदा है’ आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार प्रदर्शन करणारा सातवा चित्रपट ठरला आहे. देशोदेशीच्या प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या बॉलिवूड चित्रपटांच्या यादीवर नजर टाकली असता काही लक्षवेधी आकडेवारी पाहायला मिळते.

वाचा : वाढदिवसाच्याच दिवशी होणार दीपिकाचा साखरपुडा?

दंगल – २०२६.६५ कोटी
या यादीत आमिर खानची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘दंगल’ या चित्रपटाचा समावेश आहे. बऱ्याच बॉक्स ऑफिस विक्रमांना मोडित काढणाऱ्या या चित्रपटाने जागतिक पातळीवर २०२६.६५ कोटींचा गल्ला जमवला होता.

पीके- ७६९.८९ कोटी
या यादीत आमिरचा आणखी एक चित्रपट म्हणजे ‘पीके’. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटातून आमिर खानसोबत अभिनेत्री अनुष्का शर्माही झळकली होती. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने ७६९ कोटी रुपये इतकी कमाई केली होती.

बजरंगी भाईजान-६२९.३९ कोटी
अभिनेता सलमान खान, करिना कपूर आणि बालकलाकार हर्षाली मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या. २०१५ या वर्षात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात ३२०.३४ कोटी तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळपास ६२९ कोटींची कमाई केली होती.

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामागोमागच सलमानच्या आणखी एका चित्रपटाची वर्णी या यादीत लागली असून, तो चित्रपट म्हणजे ‘सुलतान’. त्याशिवाय ‘धूम ३’ (५५६ कोटी), ‘चेन्नई एक्स्प्रेस’ (४२४.५४ कोटी), ‘टायगर जिंदा है’ (४३२.५९ कोटी)या चित्रपटांनीही दमदार प्रदर्शन करत त्यांच्या कमाईच्या आकड्यांनी अनेकांचे लक्ष वेधले होते.