चौकटीबाहेरच्या विषयांना निवडत विविध भूमिकांना प्राधान्य देणाऱ्या अभिनेता आयुषमान खुरानासाठी हे वर्ष अत्यंत आनंददायी ठरतंय असं म्हणायला हरकत नाही. ‘अंधाधून’, ‘बधाई हो’ हे त्याचे दोन चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आणि प्रेक्षक- समीक्षकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. ‘बधाई हो’ हा बॉक्स ऑफीसवर कमाईचा १०० कोटींचा आकडा पार करणारा आयुषमानच्या करिअरमधील पहिला चित्रपट ठरला. यासोबतच या चित्रपटाने आणखी एका बाबतीत ‘बाहुबली २’सारख्या चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

चित्रपटगृहांमध्ये ‘बधाई हो’ची जादू अद्याप कायम असून सहाव्या आठवड्यात त्याने ३.९५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यासोबतच आतापर्यंत या चित्रपटाने भारतात एकूण १३२.३५ कोटी रुपये कमावले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सहाव्या आठवड्यातील कमाईचा आकडा हा ‘बाहुबली २’ पेक्षाही जास्त आहे. एस.एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाने सहाव्या आठवड्यात २.९० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे छोट्या बाबतीत का होईना, ‘बाहुबली २’ला मागे टाकणं ‘बधाई हो’साठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.

वाचा : या प्रसिद्ध मालिकेच्या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा

अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ हा चित्रपट खूपच साध्या-सरळ पण थेट पद्धतीने एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. जीतेंद्र (गजराज राव) आणि प्रियंवदा कौशिकी (नीना गुप्ता) या एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि त्याच सहजप्रेमाने संसाराचा गाडा हाकणाऱ्या या जोडप्याच्या संसारवेलीवर याच प्रेमामुळे तिसरे फूल उमलण्याची वेळ येते. मुलांसाठीही हा धक्का असतो आणि त्यांच्या आजीसाठीही हा तथाकथित सामाजिक चौकटीचा भंग असतो. एकूणच आपल्या दैनंदिन जगण्यात अशा अनेक विसंगती आहेत, ज्या लक्षात घेऊन आपण आपलेच नाही तर आपल्याबरोबरच्यांचेही जगणे सुंदर करू शकतो. पण लक्षात कोण घेतो? अशा परिस्थितीत ‘बधाई हो’सारखा अतिशय चांगला बदलत्या काळानुसार कौटुंबिक मूल्ये मांडणारा निखळ चित्रपट पर्वणी ठरतो.