‘बॉईज’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर येत्या ५ ऑक्टोबररोजी या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होणार असून विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज २’ मध्ये तीच धम्मालमस्ती अनुभवता येणार आहे.
‘बॉईज’ च्या सिक्वेलसाठी तेवढय़ाच ताकदीचा विषय निवडणे गरजेचे होते. त्यासाठी अशा विषयाच्या शोधात मी आणि लेखक ऋषिकेश कोळी होतो. चार-पाच महिने शोध घेऊनही आम्हाला काहीही सुचत नव्हते. मात्र, एकदा अचानक माझा भ्रमणध्वनी बंद झाला आणि त्यातूनच ‘बॉईज २’ ची गोष्ट सुचल्याचे देवरुखकर यांनी सांगितले.
दोन-तीन तासांसाठी बंद पडलेल्या भ्रमणध्वनी मुळे काय करु आणि काय नको अशी वेळ माझ्यावर आली तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या वयात भ्रमणध्वनी किती महत्त्वाचा असेल? असा प्रश्न पडला. याच विषयावर तातडीने ऋषीकेश कोळीशी बोललो. त्यानेही या विषयाला पसंती दर्शवून ‘बॉईज २’ चे लिखाण सुरू केले. अनवधनाने सुचलेल्या या चित्रपटात शाळेतून महाविद्यालयात गेलेल्या ‘बॉईज’ ची धमाल पाहायला मिळणार असल्याचे देवरुखकर म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 9, 2018 1:47 am