येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बॉईज २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा सीक्वेल ‘बॉईज’गिरीचा तोच धमाका घेऊ न येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शनाचा सोहळा दिमाखात पार पडला. या वेळी गायक अवधूत गुप्तेच्या लाइव्ह गाण्याने उपस्थितांची संध्याकाळ शानदार बनली.

‘बॉईज २’मध्ये शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रेम, आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाददेखील पाहायला मिळतील. चित्रपटात ओंकार भोजणे, सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या नवोदित कलाकारांसोबतच यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील या प्रसिद्ध कलाकारांचीदेखील यात भूमिका आहे. विशाल देवरुखकर यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या चित्रपटाचे संवादलेखन ऋषिकेश कोळीने केले आहे. तसेच, या तीन अतरंगी मुलांचा दंगा इरॉस इंटरनॅशनलद्वारे जागतिक स्तरावरदेखील वितरित केला जाणार असल्या कारणामुळे, ‘बॉईज २’चा ‘नॉईज’ भारताबाहेरच्या प्रेक्षकांनादेखील अनुभवता येणार आहे.