आज यशवंत नाटय़ मंदिरात प्रयोग; भीमराव पांचाळे गझल गाणार

लेखक आणि दिग्दर्शक सुनील देवळेकर यांच्या ‘एक जखम सुगंधी’ या एकांकिकेस ४ नोव्हेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात त्याच दिवशी विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रयोगाचे वैशिष्टय़ म्हणजे एकांकिकेच्या या प्रयोगात गझलनवाझ भीमराव पांचाळे हे काही गझल स्वत: गाणार आहेत.

पांचाळे यांच्या गझल असलेली ‘एक जखम सुगंधी’ ही ध्वनिफीत काही वर्षांपूर्वी बाजारात आली होती. ध्वनिफितीमधील गझल आपल्या एकांकिकेसाठी योग्य आहेत असे देवळेकर यांना वाटले आणि त्यांनी त्या वेळी लिहिलेल्या एकांकिकेला ‘एक जखम सुगंधी’ हेच नाव दिले. इतकेच नव्हे तर ध्वनिफितीमधील काही गझलांचा देवळेकर यांनी या एकांकिकेत मोठय़ा खुबीने वापर करून घेतला. एकांकिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने देवळेकर काही मान्यवर कलाकारांना घेऊन ती एकांकिका पुन्हा सादर करणार आहेत.

या प्रयोगाचे खास वैशिष्ठय़ म्हणजे देवळेकर यांनी पंचवीस वर्षांपूर्वी पांचाळे यांच्या ध्वनिफितीमधील ज्या गझला एकांकिकेत वापरल्या होत्या त्या गझला आता स्वत: पांचाळे या प्रयोगात सादर करणार आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त सादर होणाऱ्या या प्रयोगात दीपाली विचारे, आशुतोष घोरपडे, संपदा जोगळेकर, श्रीनिवास नार्वेकर, दिगंबर नाईक, सुप्रिया पाठारे आणि अन्य काही कलाकार काम करणार आहेत. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता यशवंत नाटय़ मंदिरात हा प्रयोग रंगणार आहे.