चित्रपट व मालिकांच्या जाहिरातींसाठी अनेक सर्जनशील युक्त्या वापरल्या जातात. त्यात सर्वात लोकप्रिय व पारंपरिक पद्धत म्हणजे त्यातील कलाकारांना भेटण्याची संधी मिळवणे होय. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्यांनीदेखील याच युक्तीचा परंतु काहीशा वेगळ्या प्रकारे जाहिरातीसाठी वापर केला आहे. त्यांनी इतरांप्रमाणे कोणतीही स्पर्धा वगैरे आयोजित न करता थेट मालिकेतील कलारांचे लिलाव केले आहेत.

ज्याप्रमाणे ‘इंडियन प्रीमियर लीग’, ‘फुटबॉल प्रीमियर लीग’, ‘हॉकी प्रीमियर लीग’सारख्या स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूची किंमत ठरवून त्यांचा लिलाव केला जातो. आणि सर्वात जास्त बोली लावणाऱ्या मालकाच्या संघातर्फे ते खेळाडू पुढील काही काळ खेळतात. असाच काहीसा आगळावेगळा प्रकार ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या बाबतीतही राबवण्यात आला आहे. या मालिकेतील लोकप्रिय कलाकारांचा लिलाव करण्यात आला आणि सर्वात जास्त बोली लावलेल्या व्यावसायिकांबरोबर हे कलाकार संपूर्ण दिवस वेळ घालवणार आहेत.

या लिलावात हॉलीवूडमधील जेसन सेगल, लीना डनहॅम, अर्नोल्ड श्वार्झनेगर यांसारख्या अनेक श्रीमंत कलाकारांनी भाग घेतला होता, परंतु सुपरस्टार ब्रॅड पिट या लिलावातील विशेष आकर्षण ठरला. त्याने मालिकेतील मुख्य अभिनेत्री एमिलिया क्लार्कला जिंकण्यासाठी तब्बल १ लाख २० हजार अमेरिकी डॉलर्स ( 8 कोटी ५५ लाख ९ हजार ३०० रुपये ) खर्च करण्याची तयारी दर्शवली. परंतु त्याहीपेक्षा जास्त म्हणजे १ लाख ६० हजार अमेरिकी डॉलर्स ( ११ कोटी ४८ लाख रुपये ) खर्च करून एका व्यावसायिकाने एमिलियाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळवली.

अभिनेता ब्रॅड पिट

या संपूर्ण लिलावात एक कोटी अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त पैशांची उलाढाल झाली. या कार्यक्रमात जमा झालेले सर्व पैसे अपंग व अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले जाणार आहेत. पुढल्या वेळी अधिक जास्त तयारीनिशी लिलावात भाग घेणार असल्याचे ब्रॅडने जाहीर केले आहे.