जगभरातील सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत असलेले हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पीट यांच्यातील काडीमोडानंतर दोघांमध्ये मुलांच्या हक्कावरुन वाद सुरु आहे. घटस्फोटानंतर आपल्या सहा मुलांचा हक्क कोणाकडे असावा याबाबत झालेल्या चर्चेनंतर सध्या अँजेलिनाकडे तिच्या मुलांचा हक्क देण्यात आला आहे. पण ब्रॅड पीटने यावर आक्षेप दर्शवला होता. मुलांचा हक्क आपल्याला मिळावा, यासाठी ब्रॅडने न्यायालयात दाद मागितली होती. मात्र न्यायालयाने ब्रॅड पीटची याचिका फेटाळली आहे. गेल्या दोन आठवड्यामध्ये पीटने दुसऱ्यांदा मुलांना भेटण्याची उत्सुकता दाखवली होती.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस न्यायालयातील न्यायाधीश रिचर्ड जे. बुर्डेज यांनी पीटला आपल्या मुलांना सध्या भेटता येणार नसल्याचे सांगितले. हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पीट या दोघांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. यात सहा मुलांचा ताबा अँजेलिनाकडे असून ब्रॅड विशिष्ट अटींमध्ये ब्रॅडला  मुलांना भेटण्याची परवानगी आहे. या कायदेशीर  करारांवर दोघांनीही स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. मुलांचे भविष्य पाहता या सामंजस्य करारांवर दोघांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. दोघांमध्ये निर्माण झालेल्या या दुराव्याला पीट मुलांसोबत करत असलेले गैरवर्तन कारणीभूत असल्याच्या चर्चा सुद्धा  रंगल्या होत्या.

सध्या सहाही मुलं अँजेलिनाकडेच राहत आहेत. मैडाक्स (१५), पैक्स (१२), जहारा (११), शिलोह (१०) आणि आठ वर्षांचे जुळे नॉक्स आणि विवियन आपल्या आईसोबतच राहणार. अँजेलिनाने सप्टेंबर महिन्या घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला होता. यावेळी तिने घटस्फोटाचे कारण दोघांमधले मतभेद असे सांगितले होते. हॉलिवूडच्या या नावाजलेल्या जोडीने लग्नाच्या २ वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अँजेलिना आणि ब्रॅड २००४ पासून एकत्र आहेत. २०१४ मध्ये या दोघांनी लग्न केले. १२ वर्षांच्या सहवासानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांना एकणू ६ मुले आहेत. त्यात दत्तक मुलांचाही समावेश आहे. ‘मि अॅण्ड मिसेस स्मिथ’ चित्रपटाच्या सेटवर ब्रॅड आणि अँजेलिनाची भेट झाली. या आधी ब्रॅडचे जनेफर आईन्स्टनशी लग्न झाले होते, तर अँजलिनाचे पहिल्यांदा जॉनी ली मिलर आणि त्यानंतर बिली बॉब थ्रॉंटॉनशी लग्न झाले होते.