16 December 2017

News Flash

बिग बींच्या वाढदिवशी करण जोहरने सोडले ‘ब्रम्हास्त्र’

करणने बिग बी यांना एकप्रकारे भेटच दिली

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 11, 2017 7:03 PM

दिवाळीचे औचित्य साधून करण जोहरने दर दिवशी नवनवीन फटाके फोडण्याचे ठरवले आहे असेच सध्या वाटते. काही दिवसांपूर्वी त्याने अक्षय कुमारसोबत ‘केसरी’ सिनेमा करत असल्याचे सोशल मीडियावरुन सांगितले. या बातमीचा आनंद ओसरत नाही तोवर करणने आता अजून एका मोठ्या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचे नाव आहे ‘ब्रम्हास्त्र’.

आतापर्यंत प्रेक्षकांना ‘ड्रॅगन’ सिनेमाच्या नावाची ओळख तर झालीच असेल. ‘ड्रॅगन’ सिनेमातून रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि करण जोहर एकत्र काम करणार आहेत ही बातमीही फार पूर्वी आली होती. त्यांच्या या सिनेमात आलिया भट्टही असणार असल्याचे आधीच कळले होते. याच सिनेमासाठी अमिताभ करणच्या ऑफिसमध्ये गेले होते. सुरुवातीला या सिनेमाचे नाव ‘ड्रॅगन’ असेल असे सांगण्यात आले होते. पण आता या सिनेमाचे नाव ‘ब्रम्हास्र’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार असून १५ ऑगस्ट २०१९ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमात रणबीर कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

आज बच्चन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करणने बिग बी यांना एकप्रकारे भेटच दिली आहे. सिनेमाच्या चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरूवात होणार आहे. ‘ब्रम्हास्त्र’ची कथा एका सुपरहिरोसारखी असेल असे म्हटले जाते.

या सिनेमाबद्दल बोलताना रणबीर म्हणाला की, ‘हा अयानचा सिनेमा आहे. या सिनेमातून मी पहिल्यांदा आलियासोबत काम करणार आहे. ती फार गुणी आणि सर्वात तरुण अभिनेत्री आहे. ती जेव्हा १० वर्षांची होती तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो.’

First Published on October 11, 2017 7:03 pm

Web Title: brahmastra karan johar announces fantasy adventure trilogy with ranbir kapoor alia bhatt and amitabh bachchan