करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. युरोप-अमेरिकेत तर करोनाने थैमानच घातले आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच स्तरातील लोक करोनाचे बळी ठरत आहेत. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीचे नाव जोडले जात आहे. ब्रिटीश अभिनेत्री हिलेरी हीथ यांचा करोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

हिलेरी हीथ ७४ वर्षांच्या होत्या. चार एप्रिल रोजी त्यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र सात दिवसांच्या संघर्षानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हिलेरी यांचा मुलगा अलेक्स विलियम्सनं याने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या मृत्यूची बातमी दिली.

हिलेरी हीथ हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री होती. ‘विचफाइंडर जनरल’ या भयपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘द बॉडी स्टीलर’, ‘द फाईल ऑन द गोल्डन गूस’, ‘सिटी ऑफ बॅनशी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ७०च्या दशकात त्यांना द क्वीन ऑफ हॉरर अर्थात भयपटांची राणी म्हणून संबोधले जात असे.

हिलेरी यांच्या अगोदर गायक जॉन प्राइन, एडम स्लेजिंजर अँड्रू जॅक, मार्क ब्लम आणि केन शिमूरा अशा अनेक दिग्गज कलाकारांचा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला आहे. हिलेरी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देत आहेत.