स्कार्लेट जॉन्सन आणि कॉलिन फर्थ यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘गर्ल विथ अ पर्ल इअररिंग’ या हॉलिवूडपटाचे ब्रिटिश दिग्दर्शक पीटर वेबर सध्या मुंबईत आहेत. ‘मामि’ महोत्सवात परीक्षक असलेल्या पीटर वेबर यांनी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर चित्रपट करायला आवडेल, अशी भावना व्यक्त केली.
‘अमिताभ यांच्याबरोबर काम करायला खूप आवडेल. कोणाला त्यांच्याबरोबर काम करायला आवडणार नाही? ते दिग्गज आहेत. त्यांचा अभिनयही अफलातून आहे. त्यांच्याबरोबर मला असा एक चित्रपट करायचा आहे ज्यात ब्रिटन आणि भारत या दोन्ही संस्कृतीचा संगम असेल. एक उत्तम कथा असलेला चित्रपट त्यांच्यासाठी दिग्दर्शित करायचा आहे’, असे पीटर वेबर यांनी बोलून दाखवले. ‘मामि’ महोत्सवातील आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागाचे परीक्षक म्हणून पीटर वेबर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर या विभागात दिग्दर्शक रितेश बात्रा, रॉन मान आणि महम्मत सालेह हरून हे दिग्दर्शक परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.
‘इंग्लंडमध्ये भारतीयांची संख्या मोठी असल्याने बॉलिवूडमधील कलाकार तिथे खूप लोकप्रिय आहेत. अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांच्यासारख्या बॉलिवूड कलाकारांचे तिथे खूप मोठय़ा प्रमाणावर चाहते आहेत. त्यामुळे बॉलिवूड कलाकारांबद्दल आम्हाला चांगली माहिती आहे’, असे वेबर यांनी सांगितले. मात्र, या महोत्सवाच्या निमित्ताने आत्ताचे हिंदूी चित्रपट आवर्जून पाहण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘मला आत्ताच्या भारतीय चित्रपटांची फारशी माहिती नाही. मी सत्यजित रे आणि गुरुदत्त यांच्या चित्रपटांचा चाहता आहे. त्यामुळे त्यांचे त्यावेळचे बरेचसे चित्रपट मी पाहिलेले आहेत. त्यामानाने नंतरचे हिंदी चित्रपट मी कधीही पाहिले नव्हते. आता मात्र वेळात वेळ काढून आजचा हिंदी चित्रपट पहायचा आहे’, असे सांगणाऱ्या वेबर यांनी लवकरच बॉलिवूडच्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचे असल्याचेही जाहीर केले.