आंतरराष्ट्रीय पॉपस्टर ब्रायन अ‍ॅडम्स लवकरच लाइव्ह कन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे. विशेष म्हणजे ब्रायनच्या कन्सर्टमध्ये ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि ए.आर.रेहमानही सहभागी होणार आहेत. या कन्सर्टमध्ये प्रियांका आणि रेहमानचा विशेष परफॉर्मन्सही असणार आहे.

प्रियांका आणि ब्रायननं यापूर्वी एकत्र काम केलं आहे. तर भारतीय संगीतकारांपैकी ए.आर. रेहमान हा ब्रायनचा विशेष आवडीचा संगीतकार आहे . त्यामुळे दिल्ली, मुंबईमध्ये होणाऱ्या ब्रायनच्या लाईव्ह कन्सर्टमध्ये प्रियांका आणि रेहमानचा समावेश करून घेण्याचा विचार आयोजक करत आहे.

भारतीय श्रोत्यांची नव्वदोत्तरीतील एक पिढी ब्रायन अ‍ॅडम्सच्या संगीतकक्षेत आपसूक ओढली गेली. ‘समर ऑफ सिक्स्टीनाइन’ हे त्याच गाणं आजही तितकंच प्रसिद्ध आहे. ब्रायनचं ‘एव्हरीथिंग आय डू’, ‘लव्ह फॉर वुमन’, ‘आय अ‍ॅम रेडी (स्लो व्हर्जन), ‘कट्स लाइक नाइफ’, ‘लेट्स मेक नाइट टू रिमेंबर’ या गाण्यांचा चाहता वर्ग आजही प्रचंड आहे. या वर्षांत त्याचे दोन मोठे कन्सर्ट झाले. नव्वदीच्या पिढीतील लोकांमध्ये ब्रायनच्या गाण्यांची क्रेझ अजूनही कायम आहे. त्यामुळे भारतामधील त्याच्या कन्सर्टसाठी तितकीच गर्दी होईल असं म्हटलं जात आहे.