अभिनेता अक्षय कुमारचे नाव नेहमीच सामाजिक कार्यांमध्येही घेतले जाते. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो हे मानून तो शक्य तितक्या सर्व पद्धतीने समाज कार्य करत असतो. नुकताच अक्षय ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने हागणदारी मुक्त महाराष्ट्रासाठी एक मोलाचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्र सरकारने जुन्या एसटीडी/ आयएसडी टेलिफोन बूथप्रमाणेच ठिकठिकाणी शौचालय बनवावे, अशी विनंती अक्षय कुमार या कार्यक्रमात केली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

“महाराष्ट्र सरकारने जुन्या एसटीडी/ आयएसडी टेलिफोन बूथप्रमाणेच ठिकठिकाणी शौचालयं उभारावीत. त्याचप्रमाणे हे शौचालय कुठे आहेत हे समजण्यासाठी खास एक ‘टॉयलेट अॅप’ही बनवावं. यामुळे गरजुंना शौचालय नक्की कुठे आहेत हे कळायला मदत होईल आणि जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करू शकतील”, असा मोलाचा सल्ला अक्षयने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. मुख्यमंत्र्यांनीही या सूचनेचे स्वागत करुन, लवकरच सरकारकडून हा विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.

यावेळी खिलाडी कुमारने त्याच्या ‘टॉयलेट– एक प्रेमकथा’ या सिनेमाबद्दलही सांगितलं. त्यामधला एक विनोदी संवादही अक्षयने वारंवार बोलून दाखवत ते घोष वाक्यच बनवलं. “अगर बिवी पास चाहिए, तो घर में संडास चाहिए” हा सिनेमातील संवाद सादर करताच, उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. घरात शौचालय असावं म्हणून एका महिलेने घटस्फोट मागितला. त्या महिलेचं उदाहरण देत अक्षय कुमारने महिलेचं कौतुक केलं. लग्न करायचं असेल तर घरी शौचालय असलंच पाहिजे, असे आवाहनही अक्षयने केले.

https://www.instagram.com/p/BTix_-jBH6m/