देशात सध्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जोरदार आंदोलने सुरु आहेत. विविध क्षेत्रातील तज्ज्ञानी या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी देखील या आंदोलनाबाबत आपले मौन सोडले आहे. “देशात सध्या सुरु असलेले आंदोलनं म्हणजे अराजकतेचे लक्षण आहे. आपली वाटचाल हिंसक पद्धतीने चालली असून आपण पाकिस्तान होत चाललो आहोत.” असे भालचंद्र नेमाडे टीव्ही९ ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

काय म्हणाले भालचंद्र नेमाडे?

“हे अराजकतेचे लक्षण आहे आणि हे वाढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणं कठीण आहे. आता आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरु आहे, असं मला वाटतं. आपल्या देशात असं कधी नव्हतं. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत.”

देशात कुठल्या प्रकारचे लोक येतात?

“नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग आहे. राजकारणी लोकांचा हा विषय नाही. आपल्या देशात गुप्तहेर, दहशतवादी, त्या देशातून हाकलून दिलेले गरिब-अनाथ आणि हा देश आवडतो म्हणून येणारे असे १०० प्रकारचे लोक येतात. त्या सर्वांना एकाच मापाने मोजणं बरोबर नाही. ज्यांना यायचं त्यांना येऊ द्यावं. सरकारची इतकी मोठी यंत्रणा आहे. त्यावर इतका खर्च होतो. त्यामुळे त्यातील दहशतवादी कोण आहेत हे शोधणं सरकारचं काम आहे. मात्र, कोणत्याही गरिब नागरिकाला या देशाचं नागरिक होऊ नको म्हणणे योग्य नाही” असंही भालचंद्र नेमाडे म्हणाले.