अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वातील घराणेशाही हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने कलाविश्वतील अनेक दिग्गजांवर घराणेशाहीचा आरोप केल्यानंतर अनेकांनी या प्रकरणी त्यांची मत मांडली आहेत. त्यातच आता ‘कॉलिंग सहमत’ या पुस्तकाचे लेखक हरिंदर सिक्का यांनीदेखील चित्रपट दिग्दर्शक मेघना गुलजारवर काही आरोप केले आहेत. ”राजी’ चित्रपटासाठी मला कुठेच क्रेडिट दिलं नाही असं”, हरिंदर सिक्का यांनी  ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

आलिया भट्ट आणि विकी कौशल यांची मुख्य भूमिका असलेला ‘राजी’ हा चित्रपट ११ मे २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट लेखक हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर आधारित असून हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला. परंतु, या चित्रपटाच्या यशासाठी मला श्रेय न दिल्याचं म्हणत हरिंदर सिक्का यांनी मेघना गुलजारवर काही आरोप केले आहेत.

“जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमधून माझं नाव हटविण्यात आलं होतं. इतकंच नाही तर माझं पुस्तकदेखील मेघनाने प्रकाशित होऊ दिलं नव्हतं. त्यामुळेच माझं पुस्तक प्रकाशन वेळवर होऊ शकलं नाही. राजीसाठी मला कुठेच क्रेडिट दिलं नाही. खरं तर मी बाहेरुन आलेला कलाकार आहे म्हणून हे माझ्यासोबत झालं”, असं हरिंदर सिक्का यांनी म्हटलं.

पुढे ते म्हणतात,”फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातदेखील माझ्या कथेला सर्वोत्कृष्ट मूळकथा म्हणून पुरस्कार मिळणार होता. मात्र तो पुरस्कार अंधाधून या चित्रपटाला मिळाला. हा चित्रपट एका फ्रेंच पुस्तकातील कथेवर आधारित आहे. विशेष म्हणजे मेघनाचा अलिकडेच छपाक चित्रपट प्रदर्शित झाला. खरं तर या चित्रपटाचं क्रेडिट दिल्लीतील एका वकिलाला दिलं पाहिजे. परंतु, मेघनाने त्या वकिलांनादेखील क्रेडिट दिलं नाही.

दरम्यान, यापूर्वीदेखील काही मुलाखतींमध्ये हरिंदर यांनी मेघनावर गंभीर आरोप केले होते. राजीच्या स्पेशन स्क्रिनिंगसाठी मला मेघनाने आमंत्रित केलं नव्हतं. माझ्या कादंबरीवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी मी मेघनालाच पाठिंबा देईन असं वचन मी गुलजार साहेबांना दिलं होतं. तसंच या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आलिया भट्टची निवड करण्याचा सल्लादेखील मीच दिला होता. परंतु तरीदेखील मला क्रेडिट मिळालं नाही.  इतकंच नाही तर चित्रपटाचा शेवटदेखील बदलण्यात आला होता, असं हरिंदर यांनी यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.