समाजात घडणाऱ्या घडामोडी, अडचणीचे प्रसंग या साऱ्याच्या बाबतीत कलाकारही सजग असतात. कलाविश्वात प्रेक्षकांच्या मनोरंजनासोबतच सामाजिक भान जपण्याकडेही या कलाकार मंडळींचा कल असल्याचे दिसते. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे, जस्टिन बिबर. कॅनेडिअन पॉप स्टार म्हणून नावारुपास आलेल्या जस्टिनने कॅलिफोर्नियातील जंगलात लागलेल्या आगीचा फटका बसलेल्या जनसमुदायाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मदतीचा हात पुढे करत जस्टिनने स्वत: काढलेले चित्र विकत असल्याचे सोशल मीडियावरुन जाहीर केले. इन्सटाग्रामच्या माध्यमातून त्याने हे चित्र विकत असल्याचे सांगताच अनेकांनी त्याच्या निर्णयाची प्रशंसा केली. जस्टिनने साकारलेले हे चित्र पाहून त्याच्यामध्ये दडलेल्या आणखी एका कलेचे दर्शन पुन्हा एकदा सर्वांनाच झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. चित्रात ख्रिश्चन धर्माचे प्रतीक असणारे क्रॉस असून, ‘कॅलव्हरी’ नामक या चित्रातून त्याने बऱ्याच गोष्टी सांगण्याचा जणू प्रयत्नच केला आहे.

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

काही दिवसांपूर्वी दक्षिण कॅलिफोर्निया प्रांतात जवळपास ६५ एकरांच्या भागात वणवा पेटला होता. ज्यानंतर आजूबाजूच्या परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या दुर्घटनेमुळे साधारण दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले होते. या भीषण अग्नितांडवामुळे तेथील जवळपास १६० इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य आणि समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी ओळखून जस्टिन बिबरने पीडितांना मदत करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.