‘फिल्मवाला’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे ४ डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच फक्त भारतातच नव्हे तर, इतर देशांतील चाहत्यांनीसुद्धा या चतुरस्त्र अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानमध्ये कपूर कुटुंबाच्या वडिलोपार्जित घराजवळसुद्धा या महान अभिनेत्याच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. अम्मारा अहमद यांनी ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधीचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी अहमद यांचे ट्विट रिट्विट करत याविषयीची माहिती सर्वांना दिली.

जुन्या पेशावर शहरातील किस्सा खवानी बाजार येथे कपूर कुटुंबीयांचे वडिलोपार्जित घर आहे. शशी कपूर यांच्या आजोबांनी हे घर बांधले होते. या घरापाशी घेण्यात आलेल्या शोकसभेला बऱ्याच चाहत्यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. शशीजी त्यांच्या या वडिलोपार्जित घराला कधीच विसरले नव्हते. किंबहुना पाकिस्तानमध्येही कपूर कुटुंबाप्रती बरीच आत्मीयता आणि प्रेम पाहायला मिळते. त्यामुळेच शशीजींच्या जाण्याने शेजारी राष्ट्रातूनही दु:ख व्यक्त करण्यात आले.

वाचा : BLOG : ‘फिल्मवालाज’ शशी कपूर

कलाविश्वात शशी कपूर यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. फक्त हिंदी चित्रपटसृष्टीत नव्हे तर आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वातही शशीजींनी स्वत:ची ओळख प्रस्थापित केली होती. या देखण्या अभिनेत्याच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली असली तरीही उत्तम कलाकृतींच्या माध्यमातून हा ‘फिल्मवाला’ अभिनेता कायमच स्मरणात राहील.