News Flash

‘कॅप्टन अमेरिका’- द फर्स्ट अ‍ॅव्हेंजर

शिस्त, तत्त्व आणि कमाल मर्यादेपर्यंत प्रतिकार करण्याची प्रेरणा देणारा कॅप्टन अमेरिका एक करिश्माई सुपरहिरो आहे.

अमेरिका हा देश बौद्धिक, तांत्रिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा जगभरातील इतर देशांच्या तुलनेने बराचसा पुढारलेला आहे,असे म्हटले जाते. परंतु अमेरिकन कार्टूनिस्ट वॉल्ट डिस्ने यांनी १९२८ साली जेव्हा आपले पहिले कार्टून प्रदर्शित केले, तेव्हा याच तथाकथित पुढारलेल्या अमेरिकन बुद्धिमान लोकांनी त्यांची खिल्ली उडवली होती. लहान मुलांना बिघडवणारा एक वेडा चित्रकार असे त्यांना हिणवले जात होते. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी एक वाक्य उच्चारले होते. ‘माय कार्टून इज द रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी’. वरकरणी हे वाक्य सामान्य वाटत असले तरी त्याचा मतितार्थ फार खोल आहे. आजवर आपण वाचलेली सर्व प्रकारची पुस्तकं, पाहिलेली नाटकं, चित्रपट, मालिका अशा सर्व प्रकारच्या साहित्याला वॉल्ट डिस्ने यांचे वरील वाक्य जसेच्या तसे लागू पडते. कारण बरेचसे साहित्य काल्पनिक जरी असले तरी त्या साहित्यातून मिळणाऱ्या प्रतिक्रियेत समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब दिसते. आणि याला सध्याचे चलणी नाणे म्हणजे आपले लाडके सुपरहिरो देखील अपवाद नाहीत.

१९३९ च्या सुमारास जग दुसऱ्या महायुद्धाच्या दिशने मार्गक्रमण करत होते. बेरोजगारी, अस्थिर सरकार, युद्धजन्य परिस्थिती आणि गुन्हेगारी यामुळे अमेरिकेसारखा बलशाली देशही होरपळून निघाला होता. अशा निराशाजनक वातावरणात लोकांना आशेचा किरण दाखवण्यासाठी कॉमिक्स लेखक बॉब केन यांनी ‘बॅटमॅन’ची निर्मिती केली. असेच काहीसे आगमन सुपरहिरो ‘ब्लॅक पँथर’चे देखील झाले होते. सन १९६६ अमेरिकेत काळे विरुद्ध गोरे हा वर्णद्वेषाचा वणवा पेटला होता. या वणव्यात काळे आणि गोरे या दोन्ही वर्णाचे लोक भरडले जात होते. अशा परिस्थितीत अमेरिकन नागरिकांना मानवतेची शिकवण देण्यासाठी माव्‍‌र्हल कॉमिक्सचे जनक स्टॅन ली यांनी आपला पहिला कृष्णवर्णीय सुपरहिरो ‘ब्लॅक पँथर’ तयार केला. वरील दोन्ही उदाहरणांमधून वॉल्ट डिस्ने यांचे ‘माय कार्टून इज द रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी’ हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित होते. या वाक्यानंतर त्यांनी आणखीन एक वाक्य उच्चारले होते. ‘ऑल फिक्शनल कॅरेक्टर्स आर पॉसिबिलीटीज.’ साहित्यात निर्माण केल्या जाणाऱ्या काल्पनिक व्यक्तिरेखा या शक्यता आहेत. १९४१ साली युरोपियन देश दुसऱ्या महायुद्धात भरडले जात असताना अशीच एक शक्यता म्हणून एका क्रांतिकारी सुपरहिरोचे आगमन झाले होते. हा सुपरहिरो म्हणजे आपल्या लाडक्या अ‍ॅव्हेंजर्सचा कर्णधार स्टीव्ह रॉजर्स ऊर्फ ‘कॅप्टन अमेरिका’ होय.

मार्च १९४१ साली कार्टूनिस्ट जो सिमॉन यांनी ‘कॅप्टन अमेरिका’ची निर्मिती केली. शिस्त, तत्त्व आणि कमाल मर्यादेपर्यंत प्रतिकार करण्याची प्रेरणा देणारा कॅप्टन अमेरिका एक करिश्माई सुपरहिरो आहे. आपण आजवर पाहिलेल्या सुपरमॅन, बॅटमॅन,थॉर, आयर्नमॅन यांसारख्या सर्व सुपरहिरोंकडे शत्रूंशी लढण्यासाठी लागणारी विविध प्रकारची हत्यारे आहेत. मात्र, कॅप्टनकडे कुठल्याच प्रकारचे हत्यार नाही. त्याच्याकडे आहे ती केवळ एक ढाल. म्हणूनच त्याला ‘सिंबल ऑफ डिफेन्स’ म्हणून ओळखले जाते.

सप्टेंबर १९४० मध्ये जपान पर्ल हार्बरवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. तर दुसरीकडे अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या फौजा युरोप खंडात अक्षरश: थैमान घालत होत्या. परिणामी दुसऱ्या महायुद्धासाठी लागणारे अनुकूल वातावरण तयार झाले होते. मात्र, अपुरे सैनिक आणि आर्थिक टंचाईमुळे जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून गौरवला जाणारा अमेरिका अद्याप युद्धासाठी तयार झाला नव्हता. दरम्यान, टोनी स्टार्कचे वडील हार्वड स्टार्क यांनी मानवी शक्ती कमाल मर्यादेपर्यंत पोहोचवणाऱ्या एका पदार्थाचा शोध लावला. या पदार्थाचे पहिले परीक्षण स्टिव्ह रॉजर्स नावाच्या एका अशक्त तरुणावर केले गेले. हार्वड स्टार्क यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे कधी काळी अशक्त तरुण म्हणून हिणवला जाणारा स्टिव्ह रॉजर्स आता आपल्या काळातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखला जातो. त्यानंतर स्टिव्हच्या क्षमतेचा वापर अमेरिका दुसऱ्या महायुद्धात करते आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना स्टिव्हच्या मदतीने या युद्धात भरघोस यश मिळते.

दरम्यान अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुजवेल्ट जपानवर अणू बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतात आणि यासाठी अमेरिकेन फौजेतील सुपर सैनिक स्टिव्ह रॉजर्सची निवड करण्यात येते. मनात नसतानाही स्टिव्ह आपल्या देशासाठी या मोहिमेवर जाण्यास तयार होतो. शेवटी तो हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकतो. या प्रक्रियेत स्टिव्ह शहीद होतो. त्याने केलेल्या पराक्रमासाठी त्याला कॅप्टन अमेरिका ही पदवी बहाल करण्यात येते. कॅप्टन जगासाठी मेला असला तरी त्याचे जखमी शरीर शिल्ड नामक एका संस्थेला सापडते. सुपरहिरोंना मदत करणारी ही संस्था अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याला जिवंत ठेवतात. शेवटी २० व्या शतकात कॅप्टन पुन्हा जीवित होतो. आणि थेट पृथ्वीबाहेरील संकटांना रोखण्यासाठी ‘अ‍ॅव्हेंजर्स’च्या फौजेत दाखल होतो. ही होती सुरुवात कॅप्टन अमेरिका – द फर्स्ट अ‍ॅव्हेंजरची.. तेव्हापासून कॅप्टन अ‍ॅव्हेंजर्सचे नेतृत्व करतो आहे आणि प्रेक्षकांमध्ये तो तितकाच लोकप्रिय आहे.

स्टिव्ह रॉजर्सचे व्यक्तिमत्त्व पाहता तो खूप नम्र प्रवृत्तीचा आहे. अनेकदा त्याच्या या नम्र स्वभावाची इतर सुपरहिरोंकडून खिल्ली देखील उडवली जाते. मात्र, तो आपल्या विचारांशी ठाम असतो. आपले व्यक्तिमत्त्व इतरांना आवडावे म्हणून तो स्वत:ला बदलण्यास तयार नाही. किंबहुना मी जसा आहे तसंच मला इतरांनी स्वीकारावे अशी त्याची अपेक्षा असते. आपण आजवर पाहिलेल्या सर्व सुपरहिरोंपेक्षा कॅप्टन वेगळा आहे. कारण इतरांच्या आयुष्यात अशी एक तरी घटना घडताना दिसते ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. जसे सुपरमॅनला पृथ्वीवर आल्यावर आपल्या शक्तींची जाणीव होते. स्पायडरमॅन आपल्या काकांना डोळ्यांदेखत मरताना पाहतो आणि त्याला त्याच्या कर्तव्यांची जाणीव होते. ब्रूस वेन आपल्या आई-वडिलांचा खून होताना पाहतो आणि पुढे तो बॅटमॅन होतो. तर टोनी स्टार्क आतंकवाद्यांनी पकडल्यानंतर आयर्नमॅन होतो. त्याआधी ही सर्व मंडळी निवांत जीवन जगत होती. परंतु स्टिव्ह रॉजर्स वेगळा आहे कारण कुठल्याही प्रकारच्या अपघाताने किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे तो बदललेला नाही. तो लहानपणापासूनच कर्तव्यनिष्ठ आहे.

‘कॅप्टन अमेरिका: सिव्हील वॉर’मध्ये शेवटी आयर्नमॅनबरोबर लढताना कॅप्टन अमेरिकाने एक वाक्य उच्चारले होते. ‘आय कॅन डू धिस ऑल डे, कॅन यु?’ हेच वाक्य अशक्त स्टिव्ह रॉजर्सने ‘कॅप्टन अमेरिका: द फस्ट अ‍ॅव्हेंजर’मध्ये त्याला मरेस्तोवर मारणाऱ्या रस्त्यावरील एका गुन्हेगारासमोर उच्चारले होते. यावरून एक गोष्ट लक्षात येते की स्टिव्हची क्षमता त्याच्या ताकदीवर अवलंबून नाही. क्षमता आणि ताकद या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी वेगवेगळ्या आहेत. यामुळे जर कुठल्याही घटनेमुळे त्याची सुपरहिरोवाली ताकद संपली आणि तो एक सामान्य माणूस जरी झाला तरी त्याच्यातला सुपरहिरो कॅप्टन अमेरिका काही मरणार नाही. कधीकाळी तो स्वत: एका सामान्य व्यक्तिपेक्षाही अशक्त होता त्यामुळे त्याला आपल्या शक्तीचे महत्त्व माहिती आहे. आणि हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळा बनवते.

कॅप्टन अमेरिका दुसऱ्या महायुद्धात एक सुपर सैनिक म्हणून आला होता. त्यावेळी त्याच्या विरोधात शत्रू देशांचे सैनिक होते. तेव्हा कॅप्टन बॉम्ब, तोफगोळे, बंदुका यांच्या वर्षांवात लढत होता. परंतु आता त्याच्या समोर थॅनॉस आहे. जो बंदूक किंवा तोफ गोळ्यांनी नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाची वास्तविकता बदलून लढतो. आज कॅप्टन समोर माणसांची फौज नाही तर अक्राळविक्राळ परग्रहवासीयांची फौज आहे. आणि या फौजे विरोधात लढण्यासाठी कॅप्टनकडे आर्यनमॅनसारखे आर्मर नाही. थॉरसारखे स्ट्रॉम ब्रेक नाही. व्हिजनसारखी इन्फिनिटी स्टोनची ताकद नाही. हल्कसारखे आक्रमण त्याला करता येत नाही. अँट मॅनसारखे लहान होता येत नाही. या सर्व अत्याधुनिक सुपरहिरोंच्या गटात तो एक सामान्य व्यक्ती आहे. ज्याच्याकडे स्वत:चे रक्षण करण्यासाठी केवळ एक ढाल आहे. परंतु तरीही कॅप्टन अमेरिका अ‍ॅव्हेंजर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या गटाला कॅप्टनच्या नेतृत्वाची गरज आहे, कारण ‘कॅप्टन कॅन डू धिस ऑल डे..’

mandar.gurav@loksatta.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 2:42 am

Web Title: captain america the first avenger by mandar gurav
Next Stories
1 अ‍ॅव्हेंजर्स ‘एंड’गेम शेवट की नवी सुरुवात?
2 ‘तीच मजा पुन्हा एकदा..’
3 नव्या विचारांचा ‘कागर’
Just Now!
X