#MeToo मोहिमेमुळे बॉलिवूडमध्ये दिवसेंदिवस बऱ्याच घडामोडी घडत आहेत. अनेक लोकांनी या मोहिमेबाबात स्वत:ची भूमिका घेत आरोपींसोबत काम न करण्याचं ठरवलं आहे. अशातच आता सलमानची कथित प्रेयसी लुलिया वंतूरच्या चित्रपटातूनही एका कास्टिंग डायरेक्टरची हाकलपट्टी करण्यात आली आहे. या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर विकी सिदना यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप अभिनेत्री कृतिका शर्मानं केले आहेत त्यानंतर ‘राधा क्यो गोरी मै क्यो काला’ चित्रपटातून त्यांची हाकलपट्टी करण्यात आली असल्याचं समजत आहे.

विकीनं २०१३ मध्ये माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप कृतिका शर्मानं केला आहे. तसेच तिनं विकी विरोधात तिनं महाराष्ट्र सरकारकडेही दाद मागितली असल्याचं समजत आहे. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी विकीसोबत कधीही काम न करण्याचं ठरवलं आहे. ‘राधा क्यो गोरी मै क्यो काला’ या चित्रपटात लुलिया वंतुर ही प्रमुख भूमिकेत आहे. लुलियाचा हा पहिलाच चित्रपट आहे. तसेच तो सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रटाच्या निर्मात्यानं एकमतानं विकीची हाकलपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे विकी हा ‘बटला हाऊस’चा कास्टिंग डायरेक्टर होता. त्यामुळे आता त्याच्यावरचे आरोप पाहता‘बटला हाऊस’च्या श्रेय नामावलीतूनही विकीचे नाव वगळण्यात येणार असल्याचं समजत आहे.