केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यक्षपदावरून पहलाज निहलानी यांची उचलबांगडी आणि त्यांच्या जागी प्रसून जोशी यांच्या नियुक्तीच्या निर्णयानंतर अनेकांनाच दिलासा मिळाला. चित्रपटसृष्टीतील मंडळींनी आणि सोशल मीडियावरही अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. निहलानी त्यांच्या आडमुठ्या आणि वादग्रस्त मार्गदर्शक तत्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले. उचलबांगडीनंतर निहलानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यावेळी एका वेगळ्याच कारणासाठी. सेन्सॉर बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसून जोशी यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी दांडी मारली. सोमवारी त्यांच्या कामाचा पहिला दिवस होता आणि तब्येत बरी नसल्याने ते कामावर रुजू होऊ शकले नाही अशी माहिती समोर येतेय.

‘डीएनए’च्या माहितीनुसार शुक्रवारी निहलानी यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस होता. यादिवशी त्यांनी पुढील दोन आठवड्यांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचं काम केलं होतं. यामध्ये अश्विनी अय्यर तिवारीचा ‘बरेली की बर्फी’ आणि सिद्धार्थ- जॅकलिनचा ‘अ जंटलमन’ या चित्रपटांचा समावेश आहे. नियमांनुसार सोमवारी चित्रपट निर्मात्यांना प्रमाणपत्र घेणं भाग होतं. मात्र हे काम सुरळीत पार पाडण्यासाठी सेन्सॉर बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्षच जागेवर नव्हते. अखेर निहलानी यांना कामात लक्ष देणं भाग पडलं.

वाचा : ‘पहरेदार पिया की’ मालिकेच्या अडचणीत वाढ

१८ ऑगस्ट रोजी ‘बरेली की बर्फी’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने निर्मात्यांना प्रमाणपत्र सोपवण्याचे गरजेचे होते. अशा वेळी पहलाज निहलानी यांनी सोमवारी कामकाज सांभाळला. आता प्रसून जोशी शुक्रवारी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी कामाला सुरुवात करतील अशी सूत्रांची माहिती आहे.