सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणं बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिली आहे. सर्वोच न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत सीबीआयने या प्रकरणापासून दूर राहिलं पाहिजे असंही तिने म्हटलं आहे. रिया चक्रवर्तीने वकिलांमार्फेत ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरु केला असून रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बिहार सरकारने सुशांत सिंह प्रकऱणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी शिफारस केली होती. केंद्राने अधिकृत सूचना दिल्यानंतर सीबीआयने तपास हाती घेतला असून यानंतर बिहार पोलीस जे तपासासाठी मुंबईत आले होते तेदेखील राज्यात पुन्हा परतले आहेत. रिया चक्रवर्तीने सुशांतचा मृत्यू मुंबईत झाला असल्याने बिहार पोलीस नाही तर महाराष्ट्र पोलिसांनी तपास केला पाहिजे असा युक्तिवाद केला आहे. “बिहार सरकारने अख्त्यारित येत नसतानाही सीबीआयकडे प्रकरणाचा तपास सोपवला आहे,” असं रियाने म्हटलं आहे.

रियाने सीबीआयकडे तपास देण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून तिथे योग्य प्रकारे तपास होणार नाही असं म्हटलं आहे. बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात हे संवेदनशील प्रकरण असल्यानेच तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. तर रियाने पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेला एफआयआर मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. या मागणीला बिहार सरकारने विरोध दर्शवला आहे.

१४ जून रोजी सुशांत सिंहने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. मानसिक तणावात असल्यानेच सुशांतने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात पोलीस तक्रार केली असून तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुशांतची आर्थिक फसवणूक कऱण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी बिहार पोलीस तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झालं होतं. पण आता सीबीआयने तपास हाती घेतला आहे.