20 October 2020

News Flash

सीबीआय पथक आज मुंबईत?

हे पथक घटनास्थळाची पाहणीही करण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी संबधित कागदपत्रे वांद्रे पोलिसांकडून ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष पथक गुरुवारी मुंबईत येण्याची शक्यता आहे. हे पथक घटनास्थळाची पाहणीही करण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन गोळा केलेले पुरावे सीबीआयने आधीच ताब्यात घेतले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे पथक मुंबई पोलिसांकडून घटनास्थळाच्या पंचनाम्यापासून संभाव्य साक्षीदारांच्या जबाबांपर्यंत सर्व कागदपत्रे ताब्यात घेणार आहे. यात सुशांतचे शवचिकित्सा अहवाल, न्यायवैद्यक प्रयोग शाळेने केलेला तपास, सीसीटीव्ही चित्रण, कॉल डेटा रेकॉर्डचाही समावेश असेल. दिल्लीतील सीबीआय प्रवक्त्याने लवकरच विशेष पथक मुंबईत येऊन तपास करेल, असे सांगितले.

१४ जूनला सुशांत वांद्रे  येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळला होता. वांद्रे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत आतापर्यंत ५६ जणांचे जबाब नोंदवले. सुशांतला मानसिक विकार होता, चित्रपटसृष्टीतील घराणेशाही किंवा अन्य व्यावसायिक, वैयक्तिक कारणामुळे तो निराश होता आणि त्यातून त्याने आत्महत्या केली असावी, या अंदाजाने मुंबई पोलिसांनी चौकशी पुढे सुरू ठेवली होती. मात्र बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिच्या कुटुंबियांभोवती तपास केंद्रित केला. या दोन्ही यंत्रणांनी केलेली चौकशी, तपास समोरासमोर ठेवून सीबीआय पथक व्यूहरचना ठरवेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सुशांतच्या कुटुंबाने फेब्रुवारी महिन्यात केली तक्रार,  रोजनिशीतील नोंदी, रियाने कामावरून कमी केलेल्या सुशांतच्या विश्वासू कर्मचाऱ्यांनी माध्यमांकडे दिलेल्या प्रतिक्रिया, सुशांतचा मानसिक विकार किंवा नैराश्य, रिया आणि तिच्या कुटुंबियांसोबत सुशांतने स्थापन केलेल्या कंपन्या आदी सर्व मुद्दे सीबीआय पथक तपासेल, असे समजते.

पार्थ पवारांचे ‘सत्यमेव जयते’!

मुंबई : सुशातसिंह राजपूत याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या पार्थ पवार याला कवडीची किं मत देत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी फटकारले होते. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी  बुधवारी सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यावर पार्थने  ‘सत्यमेव जयते’, अशी  प्रतिक्रि या व्यक्त करीत आजोबांवरच कुरघोडी केली. गेल्याच आठवडय़ात पार्थ हा अपरिपक्व असून, त्याला कवडीची किंमत देत नाही, असे विधान शरद पवार यांनी केले होते. पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीत चलबिचल झाली होती. अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:02 am

Web Title: cbi squad in mumbai today abn 97
Next Stories
1 बाईकवरुन स्टंट करताना अभिनेत्याचा अपघात; कोट्यवधींचा सेट जळून खाक
2 नैराश्याचा धंदा करणाऱ्यांना जनतेने आरसा दाखवला, कंगनाचा दीपिकावर हल्लाबोल
3 United For Justice: सुशांतच्या कुटुंबीयांनी सुरू केलं नवं ट्विटर अकाउंट
Just Now!
X