मला खूप मोठी लॉटरी लागली आहे आणि आता माझ्या आयुष्यात खूप बदल होतील असा एप्रिलफूलचा प्रँक काही वर्षांपूर्वी माझ्या मित्रांबरोबर केला होता. त्या वेळी आमच्याकडे पैसे नसायचे. आम्ही एकत्र जाऊन मस्त खायचे ठरवले. खूप जेवलो. पण आमच्या कोणाकडेच बिल भरण्यासाठी पैसे नव्हते. जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा मी कशीबशी मित्रांची समजूत काढली की, मला लॉटरी लागली आहे पण माझ्याकडे अजून पैसे आलेले नाहीत. तो एप्रिलफूल आम्हाला सगळ्यांनाच चांगलाच महागात पडला होता.  – जे. डी. मथेजा, अभिनेता

एप्रिलफूल जेव्हा खरा ठरतो..

कधी कधी आपण एप्रिलफूल करतो आणि आपल्याला नंतर लक्षात येते ती गोष्ट एप्रिलफूल नाही. त्या दिवशी एप्रिलफूल असल्याने आपण एखाद्याच्या सल्ल्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाही. आमच्या मित्राचे आई-बाबा नोकरीला जायचे. त्याचे आई-बाबा नोकरीला गेल्यावर हा मित्र त्याच्या गर्लफ्रेंडला घरी बोलवायचा. त्या मित्राचा एप्रिलफूल करण्यासाठी आम्ही एक दिवस सांगितले, आज तू गर्लफ्रेंडला घरी बोलवू नकोस, आज आई-बाबा लवकर घरी येणार आहेत. एप्रिलफूल असल्याने मित्राने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्या दिवसाचे काय आश्चर्य असेल.. त्या दिवशी त्याचे आई-बाबा खरंच लवकर घरी आले होते आणि आम्ही जी एप्रिलफूल म्हणून गोष्ट घडवण्याचा प्रयत्न करत होतो, ती प्रत्यक्षात घडली होती. खरं तर त्याचा एप्रिलफूल करून मजा घेण्याच्या प्रयत्नात आम्ही होतो आणि अचानक आई-बाबा लवकर घरी आल्याने त्या मित्राची चांगलीच तारांबळ उडाली होती. – स्वप्निल जोशी

लॅपटॉप हरवल्यानंतरची धांदल

मी हॉटेलच्या खोलीत माझा लॅपटॉप विसरले होते. माझ्या सेटवरील प्रॉडक्शनमधल्या एका व्यक्तीला तसा निरोप पोहोचवून मी त्याला तो लॅपटॉप घेऊन येण्यास सांगितला. काही वेळानंतर मला फोन आला आणि आम्ही हॉटेलमधून बोलत असून येथे तुमचा कोणताही लॅपटॉप नसल्याचे त्यांनी सांगितले. मी खूपच घाबरले, हॉटेलच्या त्या व्यक्तीशी मी खूप वेळ बोलत होते. माझा सहकलाकार उमेश कामत देखील काही वेळाने सेटवर आला. त्याला मी घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानेदेखील माझी समजूत काढली आणि काही काळानंतर मला कळले की मला आलेला फोन हा आमच्याच सेटवरच्या काही जणांनी मिळून केला होता. माझ्या सहकाऱ्याने येताना माझा लॅपटॉपबरोबरच आणला होता. मात्र सर्वानी नकळतच घडलेला सर्व प्रकार व धांदल कॅमेऱ्यामध्ये कैद केली होती.    – तेजश्री प्रधान

एप्रिल फूलची पार्टी रात्री साजरी केलीच!

सुरुवातीला मुंबईत राहायला आल्यावर माझ्या घरामध्ये फार काही सामान नव्हते. मला खूप लोकांचा स्वयंपाकही करता येत नव्हता. मी कधी जो काही स्वयंपाक करायचे तो नेहमी कमी व्हायचा यावरून मित्र-मैत्रिणी खूप चिडवायचे. आमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधल्या एका मित्राचे लग्न ठरले आहे म्हणून आम्ही सगळे मुंबईला घरी जेवायला येत आहोत, असा एका मित्राचा फोन आला. गावावरून दहा-बारा मित्र-मैत्रिणी येत असल्याने मी स्वयंपाकाचा घाट घातला होता. माझ्या घरी एवढय़ा लोकांचा स्वयंपाक करण्यासाठी फारसे सामानही नव्हते. गावावरून येणार असल्याने मी तीन भाज्या, पोळ्या, भात असा सर्व स्वयंपाक केला होता. मी त्यांना सारखे विचारायचे कुठे पोहोचलात, किती वेळ लागेल. फोनवर ते सारखे येत आहोत, असे उत्तर द्यायचे. अखेर संध्याकाळ झाली तरी ही ते काही घरी आलीच नाहीत. शेवटी कुणीच आले नाही, पण मुंबईच्या मित्रमैत्रिणी एकत्र येऊन पार्टी केली. – अनिता दाते