कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सुरु झालेली इंधन दरवाढ अद्यापही कायम आहे. आज सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली. सध्या मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचे दर ८४.९९ म्हणजे ८५ रुपये तर डिझेलचा ७२.७६ म्हणजे ७३ रुपये आहे. पेट्रोल-डिझेलच्या या वाढत्या किंमतीमुळे संपूर्ण देशात संताप वाढत चालला असून इंधनाच्या या वाढत्या दरांमुळे महागाई सुद्धा भडकू शकते.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामन्यांमध्ये प्रचंड संताप असून सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. यावेळी नेटकऱ्यांनी काही सेलिब्रेटी आणि राजकारण्यांनाही टार्गेट केलं आहे, ज्यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात इंधन दरवाढीवरुन रोष व्यक्त केला होता. ट्विटरकरांनी तर नरेंद्र मोदींसहित अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि काही सेलिब्रेटींचे जुने ट्विट शोधून काढले असून, आता गप्प का बसला आहात ? असा प्रश्न विचारला आहे.

यावेळी सर्वात जास्त टीका झाली ती बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारवर. अक्षय कुमारने आपलं जुनं ट्विट डिलीट केलं असल्याचं लक्षात येताच त्याला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. काहींनी त्याला कॅनडाचा नागरिक म्हणून हिणवलं तर काहींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदचा समर्थक म्हणून उल्लेख केला.

अक्षय कुमारने फेब्रुवारी २०१२ मध्ये इंधन दरवाढीवर ट्विट केलं होतं, ज्यामध्ये त्याने आता रस्त्यावर सायकल चालवायची तयारी करा असा टोला मारला होता.