चित्तथरारक साहसी दृश्यांकरिता प्रसिध्द असलेल्या विद्युत जामवालचा खूप कमी काळातच मोठा फॉलोअर्स तयार झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे ते म्हणजे त्याचे स्टंट. त्यासाठी जगातील जे टॉपचे अॅक्शन हिरो आहेत त्यांना आव्हान देणारा अभिनेता आहे. अशा या स्टंटबाज अभिनेता विद्यूत जामवालचं नाव आता जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टमध्ये सामील झालंय. याची माहिती त्याने स्वतः सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

अभिनेता विद्यूत जामवाल हा नेहमीच त्याच्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना अॅक्शन ट्रीट देत असतो. नुकतीच इंटरनेटवर जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टची यादी जाहीर झाली. यापुर्वी या यादीत की चॅन, ब्रुस ली, जॉनी ट्राय गुयेन, स्टीवन सीगल, डोनी येन, टोनी जा यांची नाव झळकत होती. आता या यादीत अभिनेता विद्यूत जामवालचं सुद्धा सामील झालंय. ही बातमी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक स्क्रीनशॉट जोडून ‘जय हिंद, कलारीपयट्टू’ असं लिहिलंय. गुगलवर ‘टॉप मार्शल आर्टिस्ट इन इंडिया’ असं सर्च केल्यानंतर आलेला हा फोटो आहे. यात सगळ्यात पुढे विद्यूतचं नाव दिसून येत आहे.

इंटरनेटवर ज्यावेळी ही यादी जाहीर झाली त्यानंतर अभिनेता विद्यूतच्या फॅन्सनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याचं अभिनंदन करणाऱ्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडतोय. यात एका युजरने लिहिलं, “आपल्या देशाचा गौरवान्वित करा” तर आणखी एका फॅनने लिहिलं, “तुम्हाला कुणीच हरवू शकणार नाही”.

२०१८ साली विद्यूत जामवालचं लूपर मार्शल आर्टिस्टमध्ये सामील केलं होतं. अशा प्रतिष्ठित यादीत सामील झालेला हा पहिलाच भारतीय होता. त्यानंतर २०२० मध्ये विद्यूतने त्याच्या कलारी थर्ड आय ट्रेनिंगची झलक दाखवली होती. त्यानंतर आता जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टच्या यादीत त्याचं नाव आलंय. त्यामुळे जेव्हा विद्यूतचं नाव गुगलवर सर्च कराल तेव्हा त्याच्या नावाच्या बाजुला जगातील सर्वोत्तम मार्शल आर्टिस्ट असं लिहिलेलं आढळेल. ही त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.