‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमधून काही थरारक खेळ खेळणारी अभिनेत्री, मॉडेल आणि सूत्रसंचालिका शिबानी दांडेकर सध्या ‘ट्रोल पोलिस’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आली आहे. विविध धाटणीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ‘एम टीव्ही’ या वाहिनीवर ‘ट्रोल पोलिस’ प्रदर्शित करण्यात येतं. अशा या अनोख्या कार्यक्रमात यावेळी शिबानी तिच्या ट्रोलर्सचा सामना करणार आहे. नुकतच या भागाचं चित्रीकरण करण्यात आलं असून, ट्रोलर्सनी शिबानीवर शेलक्या शब्दांत टीका केल्याचं पाहायला मिळालं.

काही दिवसांपूर्वीच तिने इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन एक टॉपलेस फोटो शेअर केला होता. ज्यानंतर ती प्रकाशझोतात आली. शिबानी सहसा सोशल मीडियावर बरेच बोल्ड फोटो पोस्ट करत असते. पण, यावेळी मात्र ट्रोलर्सनी तिला धारेवर धरत मर्यादा सोडून वागत असल्याचं म्हणत ‘हे अती होतंय’, अशा कमेंट्स केल्या. ‘आम्हाला वाटलं की हा किम कर्दाशियांचाच फोटो आहे’, असं म्हणतही अनेकांनी तिची खिल्ली उडवली. तर काहींनी ‘ही तर इन्स्टा प्रोफाइल नसून एखादी पॉर्न साइट आहे’, असं म्हणत अतिशय शेलक्या शब्दांमध्ये तिच्यावर टीकेची झोड उठवली.

वाचा : प्रिय आईस.. तू माझं सर्वस्व होतीस, जान्हवी कपूरने जागवल्या श्रीदेवींच्या आठवणी

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगविषयी आणि अशा कमेंट्स करणाऱ्यांच्या मानसिकतेविषयी शिबानी म्हणाली, ‘सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट पोस्ट करण्यापूर्वी त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येणार याविषयी आपण आधीच सजग असलेलं बरं. त्यामुळे माझी खिल्ली कोणी उडवली यापेक्षा माझी खिल्ली नेमकी का उडवली गेली, हेच जाणून घेण्यासाठी मी जास्त उत्सुक आहे’. शिबानीची ही उत्सुकता आणि तिला पडलेले प्रश्न या साऱ्यांच्या उत्तरांचा उलगडा ‘ट्रोल पोलिस’मध्ये होणार आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर आपली खिल्ली उडवणाऱ्यांना उत्तर देत शिबानी म्हणाली, ‘सोशल मीडियावर कोणत्याही कपड्यांमध्ये कधीही आणि काहीही पोस्ट करणं मी सुरुच ठेवेन. इतर सर्वजण माझ्याविषयी काय विचार करता याने मला फरक पडत नाही. कारण, मी काय पोस्ट करत आहे हे मी चांगलच जाणते. ज्यात चुकीचं काहीच नाही. तेव्हा जर फक्त आणि फक्त एका फोटोमुळे तुम्ही माझ्यावर प्रतिक्रिया देणार असाल, माझ्याविषयी उलटसुलट विचार करणार असाल, तर मला अनफॉलो करा. हे सर्व इतकं सोपं आहे.’ शिबानीचं हे वक्तव्य पाहता ट्रोलर्सना तिनेही त्यांच्याच शब्दात अगदी चोख उत्तर दिलं आहे असं म्हणायला हरकत नाही.