हेमांगी कवी

‘अभिनयातला गुरू किंवा आदर्श कोण?’ या प्रश्नाला मला कधीच एका शब्दात किंवा वाक्यात उत्तर देता आलं नाही. अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यात मला भरभरून शिकवणाऱ्या अभिनेत्रींची संख्या मोठी आहे.

मुलाखतीमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न – अभिनयातला गुरू, आदर्श कोण? अभिनय कुठून शिकलात? आणि यांना एका वाक्यात मला कधीच उत्तर देता आलं नाही. कारण ते मी अमुक एका व्यक्तीकडून, कुणा एकाला आदर्श मानून किंवा कुठल्याच संस्थेमधून अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही म्हणून. त्यामुळे वेळेअभावी म्हणा किंवा मग वेळ मारून नेण्यासाठी म्हणा त्या वेळी जे सुचेल ते एक-दोन वाक्यांत उत्तर दिलं. पण आज मला त्याचं खरं उत्तर द्यायची अशी सुवर्णसंधी चालून आली म्हटल्यावर वाटलं की विस्तृतपणे उत्तर द्यावं.

कलेची आवड लहानपणापासूनच होती. आई-बाबा दोघेही कलासक्त. दोघांनाही जुन्या गाण्यांची, चित्रपटांची, संगीताची, नृत्याची आवड. जरी त्यांनी यातली कुठलीच कला शिकून आत्मसात केली नसली तरी नकळत सगळ्या कलांकडे, त्यातील सौंदर्यशास्त्र कलात्मक दृष्टीने बघण्याची त्रयस्थपणे का होईना घरामध्ये सगळ्यांना आपसूक सवय झालेली. त्यात माझा कल चित्रकलेकडे जास्त होता. पुढे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेऊन रीतसर चित्रकला शिकले. शेवटच्या वर्षांला पोट्र्रेचर हा विषय घेतल्यामुळे रंगसंगती, रंगछटा, पोत, छाया-प्रकाश, ब्रश स्ट्रोक्स, कॅरक्टरायजेशनची बठक भक्कम झाली. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना कधीच वाटलं नव्हतं की अभिनयाच्या क्षेत्रात पुढे काम करेन आणि या सगळ्यांचा उपयोग मला कधी तरी होईल. पण आज मला या शिक्षणाचा पदोपदी उपयोग होतो आणि म्हणूनच या कलेला मी माझा पहिला गुरू मानते.

कॉलेजमध्ये असताना हेमंत लब्धे, विजू माने यांच्यासोबत एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेऊन रंगभूमीची मुळाक्षरे शिकले. विजू मानेंनी माझ्यातल्या अभिनयाची चुणूक ओळखून द्रोणाचार्य होऊन मला अर्जुन बनवून अक्षरश: हाताला धरून अभिनयातली धनुर्वद्यिा शिकवली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. त्या दरम्यान माधवी जुवेकर, अदिती सारंगधर या नावांचा सगळ्या एकांकिका स्पध्रेत दबदबा असायचा. माधवी जुवेकरचं ‘लाली लीला’, ‘स्थळ नि:संशयकल्लोळ’मधलं काम पाहून पात्रांची एनर्जी, शक्ती काय आणि किती असावी हे शिकले. ज्याचा उपयोग मला ‘फू बाई फू’मध्ये काम करताना झाला. अदितीची ‘मंजुळा’, ‘वादळवाट’ची रमा पाहून पात्र रंगवण्यासाठी लागणारी योग्य ती प्रखरता, इंटेन्सिटी शिकले. स्पध्रेत याच गोष्टींचा वापर करून अनेक बक्षिसं मिळवली, पण तेव्हाही या क्षेत्राकडे करिअर म्हणून गांभीर्याने कधीच पाहिलं नाही. नाटक, सिनेमे एक आवड म्हणून पाहणं चालूच होतं.

अशातच मुक्ता बर्वेचं ‘देहभान’ हे व्यावसायिक नाटक पाहिलं! बस! मलाही असंच काही तरी करायचंय, असंच व्यक्त व्हायचंय वाटू लागलं आणि याच क्षेत्रात करिअर करायचं ठरवून टाकलं. रंगभूमीवरचा वावर सहज कसा असावा, देहबोली कशी असावी, आवाज कसा लावायचा हे तिच्या अनेक कामांकडे पाहून शिकले. पुढे ‘वादळवाट’सारख्या मालिकेत काम करायची संधी मिळाली. तिथे नीलम शिर्केसारख्या कमालीच्या ताकदीच्या अभिनेत्रीचं काम अगदी जवळून पाहायला मिळालं. विनोदी आणि गंभीर अशा अत्यंत टोकाच्या अभिनयाच्या या दोन्ही छटा कशा रंगवायच्या हे नीलमच्या कामांकडे पाहून शिकले. सगळ्या कामांमधलं वैविध्य कसं असावं हे कळलं. कॅमेरा ऑन झाल्यानंतरची ‘विशाखा’ आणि ऑफ झाल्यानंतरची ‘नीलम’ यांत कमालीचा फरक असायचा. या क्षेत्रातलं हे एक खूप महत्त्वाचं ‘ऑन आणि ऑफ’ होण्याचं तंत्र मी तिच्याकडून शिकले. व्यक्तिरेखा आणि व्यक्तीमधली ही तफावत प्रत्येक अभिनेत्यासाठी खूप गरजेची असते.

दुसरं महत्त्वाचं तंत्र म्हणजे कुठलीही भूमिका असो- गंभीर, विनोदी अथवा वास्तववादी- त्या भूमिकेचा, व्यक्तिरेखेचा तोल जाऊ न देणं हे प्रचंड कठीण आणि जिकिरीचं हे तंत्र. अशा वेळी त्या व्यक्तिरेखेचा समतोल राखून अभिनय करणं मी लीना भागवतसारख्या कसलेल्या अभिनेत्रीच्या अनेक कामांकडे पाहून, तिच्यासोबत काम करून शिकले. ज्याचा मला ‘धुडगूस’ या चित्रपटामध्ये फायदा झाला. व्यक्तिरेखेतली अचूकता, जास्तीत जास्त वास्तववादी वाटावी यासाठी लागणाऱ्या सर्वागीण गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं, तरच एखादी भूमिका खूप खरी वाटू लागते. असा भूमिकेचा सर्वार्थाने विचार करणं आणि तो अमलात आणणं मी वर्षां दांदळेकडून शिकले.

रंगभूमीपेक्षा कॅमेऱ्यासमोर अपेक्षित असलेल्या अभिनयाचं तंत्र आणि कौशल्य थोडं वेगळं असतं. म्हणजे रंगभूमीवर गरजेची असलेली देहबोली, वावरण्याची सहजता, आवाज, रंगभूषा, शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचेल असा जरा अधिक हालचालींच्या अभिनयाच्या तुलनेत कॅमेऱ्यासमोर कमी हालचालींच्या आणि चेहऱ्याच्या, डोळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त हावभाव दाखवल्या जाणाऱ्या अभिनयाची अपेक्षा असते. हे कौशल्य मी कादंबरी कदमकडून ‘अवघाची संसार’ ही मालिका तिच्यासोबत करत असताना शिकले आणि याच सोबत या क्षेत्रात वावरत असताना आपल्या वागण्या, बोलण्यात लागणारे मॅनर्स, अत्यंत महत्त्वाचे असे काही अलिखित नियमांचे धडेही मी तिच्याकडून शिकले ज्याचा फायदा मला िहदीत काम करताना होतो.

या क्षेत्रात अभिनयासोबत इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे ‘अभिनेत्रीने प्रेझेन्टेबल राहणे’. अभिनयासोबत स्वत:ला ग्रूम कसं करावं, कुणाचीही कॉपी न करता स्वत:ची अशी वेगळी, आपल्याला शोभेल, ती दिमाखात वापरात आणता येईल अशी स्टाइल तयार करणं हे िहदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केलेल्या नेहा पेंडसेसारख्या सुंदर दर्जेदार अभिनेत्रीकडून ‘मराठी तारका’च्या दौऱ्याच्या दरम्यान शिकले. त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात चांगलाच फरक दिसू लागला. जसे सगळ्याच क्षेत्रांत यश-अपयशाचे चढ-उतार असतात तसेच याही क्षेत्रात आहेत. त्यातून या क्षेत्रात चांगलं काम मिळण्याची प्रतीक्षा करणं, अटीतटीच्या स्पध्रेत स्वत:ला सिद्ध करून दाखवायची कसोटी, अपयशातून निर्माण होणारं नराश्य अशा अनेक गोष्टी तुमच्यातल्या कलाकाराला अस्वस्थ करू शकतात. यावर मात करण्याची क्षमता, आलेल्या कोणत्याही संकटांवर धाडसी वृत्तीने सामना करण्याचं सामथ्र्य, काही नकारात्मक गोष्टींकडे सकारात्मक पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन जो या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी खूप गरजेचा असतो तो मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिकून आलेल्या रसिका आगाशेकडून ‘फू बाई फू’च्या रंगमंचावर काम करताना शिकले.

रंगभूमीवर किंवा छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावर लागणाऱ्या आत्मविश्वासासोबतच वैयक्तिक आयुष्यामध्ये लागणारा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो जो रंगभूमीवर, पडद्यावर काम करत असताना घाबरून न जाता कोणासोबत किंवा कुणासमोर निर्भीडपणे उभं राहण्याची ताकत देतो. ‘एव्हरीथिंग इज पॉसिबल’ हे ब्रीदवाक्य तिलाच बघून लिहिलं असावं इतक्या निर्भीडपणे बिनधास्तपणे सकारात्मक अप्रोचने प्रत्येक गोष्टीकडे बघणाऱ्या श्रुती मराठेसारख्या आणखी एका सुंदर आणि गुणी अभिनेत्रीसोबत ‘एकापेक्षा एक’च्या काळात काम करताना शिकले. या क्षेत्रातल्या अनेक गुण-दुर्गुणांपकी एक दुर्गुण ज्याची लागण कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीला सहज होऊ शकते ती म्हणजे यशाची हवा डोक्यात जाणे. ज्यामुळे आपण आपल्याच कोशात राहून, आव्हान देणाऱ्या, आजमावून पाहणाऱ्या संधीची दारं अहंकाराची कडी लावून आपल्याच हातानं बंद करून आपल्यातल्या अभिनयाचा बहर खंडित करू शकतो. आणि या आजाराची लागण आपल्यातल्या कलाकाराला होऊ नये याची दक्षता बाळगणं खूप महत्त्वाचं. ही दक्षता इतकी र्वष चित्रपटसृष्टीत एक सुंदर, उत्तम, बंडखोर अभिनेत्री म्हणून अधिराज्य गाजवणाऱ्या आणि कुठल्याच गोष्टीचा अहंकार न बाळगणाऱ्या वर्षां उसगावकारांसोबत ‘मड्डम सासू ढड्डम सून’च्या वेळी काम करताना मी घेतली.

आपला अभिनय अधिकाधिक उत्तम होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या लहान-मोठय़ा गोष्टींचा विचार करण्यासाठी, मेहनत घेण्यासाठी, त्या शिकण्यासाठी कायम प्रयत्नशील असायला हवं. या सगळ्या उत्तम अभिनेत्री माझ्या मत्रिणी असल्या तरी त्यांच्यासोबत प्रत्यक्षपणे काम करून, त्यांचा अभिनय जवळून पाहून, त्यांची काम करण्याची पद्धत पाहून नकळतपणे त्यांना गुरुस्थानी ठेवून त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत गेले. ज्यांचा सोबत प्रत्यक्षपणे काम करायचं भाग्य मला लाभलं नाही अशा अनेक जुन्या नवीन म्हणजे अगदी लहानपणी पडद्यावर पाहिलेल्या मीनाकुमारी, नíगस, नूतन, वहिदा रहमान, वैजयंतीमाला, मधुबाला, स्मिता पाटील, शबाना आझमी, श्रीदेवी, जुही चावला, काजोल आताच्या काळातल्या अनुष्का शर्मा, आलिया भट यांचे सिनेमे ते आपल्या मराठीतल्या सुकन्या कुलकर्णी, शुभांगी गोखले, सोनाली कुलकर्णी (सीनियर), देविका दफ्तरदार, अमृता सुभाषसारख्या मातब्बर अभिनेत्रींची रंगभूमी, सिनेमा, मालिकांमधलं काम पाहून आणि हॉलीवूडमधल्या मेरील स्ट्रिप, औड्री हेपबर्न, जुलिया रॉबर्ट्स, सॅन्ड्रा बुलॉक, निकोल किडमन, कॅमरन डीयाझ, केथ ब्लँचेट, केट िवसलेट, एमा स्टोनसारख्या अभिनेत्रींचे काम पाहून माझ्यातली अभिनेत्री समृद्ध होत गेली.

या सगळ्यांना आदर्शस्थानी ठेवून त्यांना कुठेही कॉपी न करता अभिनेत्री म्हणून स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न, वेगळी ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया, शिक्षण अजूनही चालूच आहे आणि ते कायम चालू राहणार आहे. त्यासाठी मी या सगळ्यांची कायम ऋणी राहीन. उत्तम दर्जाचं काम, त्याला मिळणारा प्रतिसाद, मिळणारे पुरस्कार हीच या सगळ्यांना दिलेली गुरुदक्षिणा.
या क्षेत्रात चांगल्या कामाची प्रतीक्षा करणं, स्पध्रेत स्वत:ला सिद्ध करून दाखवायची कसोटी, अपयशातून निर्माण होणारं नराश्य तुमच्यातल्या कलाकाराला अस्वस्थ करू शकतात.

हेमांगी कवी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा