अमेय वाघ
सध्या एकत्र कुटुंब पद्धत फारशी दिसत नाही. जी आहे ती नवरा-बायको, मुलं आणि आजी-आजोबा अशी. पण मी खऱ्या अर्थाने एकत्र कुटुंबात राहिलोय. तेही ६८ माणसांच्या एकत्र कुटुंबात!

प्रत्येकासाठी त्याचं घर अत्यंत महत्त्वाचं असतं. घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत. तर त्यातलं कुटुंबसुद्धा. माझ्यासाठीही माझं घर आणि कुटुंब हे दोन्ही खूप महत्त्वाचं आहे. ‘घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती.. इथे असावा प्रेम, जिव्हाळा, नकोत नुसती नाती’ असं अनेकदा ऐकलं, वाचलेलं मी अनुभवलंसुद्धा आहे. आपण राहतो ती जागा निर्जीव असली तरी तिच्याशी एक वेगळं नातं जोडलं गेलेलं असतं. त्यातली प्रत्येक जागा, कोपरा आपण अनुभवत असतो. त्या जागांच्या आठवणी मनात असतात. वारंवार आपण त्याचा आनंद घेत असतो आणि या आनंदाचं कारण असतं आपलं कुटुंब. माझं घर आणि कुटुंब या दोन्हींच्या आठवणी माझ्या मनात आजही ताज्या आहेत.

माझ्या आजोबांना सात भाऊ आहेत. अहिरे नावाच्या गावात माझे बाबा आणि त्यांची भावंडं मोठी झाली. माझ्या आजोबांच्या पिढीपासून आमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यामुळे बरेच ट्रक वगैरेही आहेत. हा व्यवसाय पुढे वाढवत आजोबांच्या पुढच्या पिढीने म्हणजे माझे बाबा आणि काकांनी नंतर पुणे गाठलं. पुण्यात व्यवसायाचा पसारा वाढवला आणि मोठा केला. पुण्यात मोठी जागा घेऊन तिथे पाच इमारती बांधल्या. दोन-दोन मजल्याच्या या इमारतींमध्ये एकूण आठ आजोबांची कुटुंबं राहत होती. आम्ही एकूण ६८ जण आहोत कुटुंबात. खऱ्या अर्थाने आमचं एकत्र कुटुंब आहे. प्रत्येक इमारतीत साधारण दोन कुटुंबं असे आम्ही राहत होतो. उरलेल्या घरांमध्ये भाडेकरू राहायचे. त्या इमारतींमध्येच एक मंदिरसुद्धा बांधलं होतं. तिथेच सगळे सण साजरे व्हायचे. त्यातल्या दोन इमारतींच्या मधोमध थोडी जागा होती; तिथे आम्ही भावंडं क्रिकेट खेळायचो. तिथेच एक आंब्याचं झाडंही होतं. त्या झाडावरच्या कैऱ्या लपूनछपून पाडायच्या आणि पळायचं, हा आमचा सुट्टय़ांमधला ठरलेला खेळ. पण खरं तर असं लपूनछपून कैऱ्या पाडायची गरजच नव्हती. कारण ते झाडंही आमचंच होतं आणि त्या इमारतींमध्ये राहणारी सगळी कुटुंबंही आमचीच. तरी ते लपून कैऱ्या पाडून पळून जाण्यात थ्रिल असायचं. आता हे सगळं आठवलं की माझंच मला हसायला येतं.

एकत्र कुटुंबाची आताची व्याख्या बदलली आहे. नवरा-बायको, मुलं, आजी-आजोबा हे सगळे एकत्र राहणं म्हणजे एकत्र कुटुंब अशी आजची व्याख्या आहे. पण मी खऱ्या अर्थाने एकत्र कुटुंबात वाढलोय, राहिलोय. १६ वर्षे मी हा अनुभव घेतलाय. आम्ही इमारतीत एकत्र राहत असलो तरी तिथे कधीच बंदिस्त वातावरण नव्हतं. एकमेकांच्या घरी जायचं, बिनधास्त स्वयंपाकघर वापरायचं, पदार्थाची देवाणघेवाण करायची, पत्ते-कॅरम खेळायचा, गप्पा मारायच्या असं नियमितपणे व्हायचं. दिवाळीत एकाच्या घरी फराळ तर दुसरीकडे जेवण, तर आणखी कोणाकडे दुपारचा चहा असे कार्यक्रम आधीच ठरलेले असायचे. आम्हाला एकमेकांचा सहवास इतका आवडायचा की आम्ही सेलिब्रेशनसाठी काही तरी निमित्त शोधत असायचो. आमच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा वर्धापन दिन तर आमच्यासाठी खासच! त्या वेळचा दिनक्रम मला चांगलाच आठवतो. दुपारपासूनच सगळे मिळून आमरस काढायला एकत्र बसायचो. त्या दिवशी जेवणात फक्त आमरस पोळीचा बेत असायचा. कोण जास्त खातंय याची स्पर्धा असायची. आमच्या अहिरे गावात दरवर्षी महाशिवरात्रीचा मोठा उत्सव असतो. त्या वेळी आम्ही सगळे पुण्या-मुंबईहून तिथे जातो. तीन-चार दिवस आम्ही तिथे एकत्र असतो. तिथे जाऊन साफसफाई करतो, गावजेवण असतं, गावातल्या लोकांना जेवायला वाढतो अशी सगळी कामं आम्ही सगळे करतो. या सगळ्यात एक गंमत म्हणजे गावाला जाताना आम्ही सगळे एकत्र आमच्याच ट्रकने प्रवास करतो. त्या ट्रकच्या मागच्या बाजूला वेल्डिंग करून शेड लावलेली असते. तिथे गाद्याही असतात. या प्रवासात जी धमाल येते त्याला तोडच नाही. फक्त गावालाच नाही पण आमचं सगळं कुटुंब एकत्र सहलीला जातानाही आम्ही ट्रकने प्रवास करतो. मी ट्रकने प्रवास करतो, असं कोणाला सांगितलं तर ते कदाचित खरं वाटणार नाही. पण खरंच सांगतो ट्रकचा तो प्रवास म्हणजे सुख आहे.

माझी सख्खी-चुलत भावंडं साधारण माझ्याच वयाची आहेत. त्यामुळे आम्ही इतकी धमाल केली आहे की त्या आठवणींचा खजिनाच आता आम्हा सगळ्यांकडे जमा आहे. आम्ही भावंडं वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतो. मला वाटतं, आम्ही सगळे आता करिअरच्या ज्या टप्प्यावर आहोत त्यात प्रत्येकाचं काही ना काही योगदान नक्की आहे. आमच्यापैकी काही जण शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात आहेत. पण आम्ही ठरवून अनेकदा विशिष्ट ठिकाणी भेटतो. एकमेकांच्या आयुष्यात, करिअरमध्ये काय सुरू आहे त्याबाबत आदानप्रदान करतो. मजा-मस्ती-धमालसुद्धा करतो. हे सगळं करत असताना आम्ही एकमेकांबद्दलचा आदर कमी होऊ देत नाही. तसंच एकमेकांची किंमतही ठेवून असतो. आमच्याकडे सतत लोकांचं येणं-जाणं असायचं. नातेवाईक, मित्र यांच्या भेटीगाठी सतत व्हायच्या. त्यामुळे घरात नेहमी प्रसन्न वातावरण असायचं. सतत वेगवेगळ्या प्रकृतीची, स्वभावाची माणसं आजूबाजूला असल्यामुळे मी आत्तापर्यंत साकारलेल्या पात्रांवर त्यांचा कळत नकळत प्रभाव पडला. आमच्याकडे सगळ्यांची विनोदबुद्धी चांगली आहे. त्याला थोडी पुणेरी छटा आहेच. त्यामुळे साहजिकच त्यांच्या सहवासात सतत राहिल्यामुळे त्याची मदतच झाली.

काही वर्षांपूर्वी आम्ही पुण्यातच वेगळ्या भागात राहायला गेलो. मी तेव्हा साधारण १७-१८ वर्षांचा असेन; पण सतत अनेक लोकांसोबत राहायची सवय असल्यामुळे असं अचानक चारच लोकांसोबत राहणं थोडं कठीण गेलं. घर माणसांनी भरलेलं असायला हवं. मी घरात एकटा आहे असं कधीच झालं नाही. घरात एकटं राहणं ही संकल्पनाच मला फारशी माहीत नाही. घरात सतत आजूबाजूला माणसं असण्याची मला सवय आहे. आता कामानिमित्त मुंबईत कधीकधी एकटं राहण्याची वेळ येते. सगळ्यात पहिल्यांदा मुंबईला राहायला आलो तेव्हा मला ते खूप जड गेलं. मला ते घर खायला उठायचं. सवयच नव्हती. हळूहळू सवय होत गेली.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…

आता एकत्र कुटुंबातून बाहेर पडून बरीच र्वष झाली; पण आजही ते सगळे दिवस जसेच्या तसे आठवतात. एकत्र कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. माझ्या नातेवाईकांचं एक वैशिष्टय़ मला नेहमी जाणवतं. संकटाच्या वेळी कोणताही विचार न करता मदतीसाठी ते धावून येतात. असे माझे सगळे नातेवाईक माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. आनंदाच्या क्षणात सहभागी होण्यासाठी सगळेच तयार असतात. आनंदी राहणं सगळ्यांनाच आवडतं; पण दुसऱ्याच्या दु:खात स्वत:ला सहभागी करून घेणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. माझ्या घरातले सगळेच यासाठी नेहमी सज्ज असतात. कोणत्याही मदतीसाठी ते कधीही, कसेही मदत करतात आणि याचा अनुभव मला अनेकदा आला आहे. माझ्या सिनेमाचा प्रीमिअर, नाटकाचा प्रयोग या सगळ्याला माझं संपूर्ण कुटुंब नेहमी येतं. सिनेमाच्या वेळी तर सिनेमागृहात माझेच ५०-६० लोक असतात. र्अध थिएटर त्यांनीच भरलेलं असतं.

खरंच, घर आणि कुटुंब हे आपल्या आयुष्यातले किती महत्त्वाचे घटक आहेत. आपण जिथे जगत असतो ती जागा म्हणजे आपलं घर आणि तिथे आपण ज्या लोकांसोबत राहातो ती माणसं हे दोन्ही आपल्याला खूप काही शिकवतात. त्यांचा सहवास आपलं आयुष्य समृद्ध करत असतो आणि मी तर ६८ लोकांमध्ये लहानाचा मोठा झालोय; म्हणजे माझ्याकडे अनुभवांचा, आठवणींचा किती खजिना असेल!

शब्दांकन – चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा