News Flash

CELEBRITY BLOG: तिच्या तीन कविता

आणखी पाचच मिनिटं थांब, याचा आग्रह धरणारा..

| February 21, 2014 01:15 am

एक…
तिला दिसतो, कधी आठवतो पुसटसा ‘तो’
तिच्यासाठी धडपडणारा…
तिचा वाढदिवस, तिच्या आवडीनिवडी जपणारा..
तोच ‘तो’ तिच्यात मनसोक्त हरवून जाणारा…
‘व्हॅलेन्टाईन डे’ला काय करू आणि काय नाही
यासाठी आकाश-पाताळ एक करणारा…
आणखी पाचच मिनिटं थांब, याचा आग्रह धरणारा..
लगेच निघाले की बडबडणारा…
‘रूमवर चल’ याला नकार दिला की
आकांडतांडव करणारा…
त्याची धडपड कामी आली
हो हो, नाही नाही म्हणता
लग्नघटिका जवळ आली
तो वेगळय़ा कास्टचा मी वेगळय़ा कास्टची
मी विरघळवलं स्वत:ला
आता मी माझी नाहीच
फक्त त्याच्याच थॉट्सची..

दोन…
जादूच ती
विश्वास नाही माझा
पण काळी जादूच ती..
‘तो’ चा ‘पुरुष’ झाला
सरडय़ाला साक्षात
रंग बदलताना पाहिला
माझ्यासाठी कुणाचीच तमा न बाळगणारा..
‘तो’ आता इतरांची काळजी करू लागला
जणू मी लिलावात घेतलेली दासीच
मालकासारखा वागू लागला
तोडू कसं, बोलू कसं..?
त्याच्या आडनावाचं आवरण सोडू कसं..?
तो राक्षसच
त्याचा जुलूम अनावर झाला
दिवसरात्र पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला
त्यातच
कपाळावरचा लाल ठिपका थरथरला..
दुभंगला..
आता असते एकटी, कुणाशी बोलवत नाही
उमाळा येतो लाटेचा, डोळय़ाच्या कडा मात्र ओलवत नाही

तीन…
तिला माहीत होतं, तिला कुठंच जायचं नाही
पण तिनंच ठरवलं होतं
आता मागे वळून बघायचं नाही..
गेले ते दिवस, गेल्या त्या रात्री
स्वप्नांना आपसूकच लागली कात्री
दचकून उठते रात्री बेरात्री
तो जवळ नाही याची करते खात्री
मग रात्रभर डोळय़ाला डोळा लागायचा नाही..
कारण पण तिनंच ठरवलं होतं
आता मागे वळून बघायचं नाही..।।१।।
मग पुन्हा एक ओसाड दिवस उगवायचा
मरत नाही म्हणून जबरीनं जगवायचा..
अस्ताला अस्ताचीच वाट पाहायला लावायचा
तिला वाटायचं मीच का हळहळते..?
तीच जखम पुन:पुन्हा का भळभळते..?
पण हे सगळं आतल्या आत..
कुणाला काही सांगायचं नाही
कारण तिनंच ठरवलं होतं
आता मागे वळून बघायचं नाही..।।२।।
त्याला मी आठवत असेल का..?
त्याचं काय चाललं असेल..
मी अजूनही त्याच्या बेरजेत असेल..?
जितकं त्याला दूर लोटावं
तितकं तो आत-आत घर करतोय
सगळं उद्ध्वस्त करूनही
अजून पुन:पुन्हा का पोखरतोय?
त्याचं गारुड काही केल्या उतरायचं नाही
पण तिनंच ठरवलं होतं
आता मागे वळून बघायचं नाही..

ता.क.
……………. ,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,., !!!!!!!!!!!!!!!!, ??????????????? ()./..
– मिलिंद शिंदे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 1:15 am

Web Title: celebrity blog by actor milind shinde about three poems
Next Stories
1 ‘सेक्स अॅण्ड डेमन’ चित्रपटाच्या नायिकांचे ग्लॅमरस फोटो शूट
2 घुंगराच्या नादात
3 फर्स्टलूक: सोनाक्षी सिन्हाचा ‘तेवर’
Just Now!
X