पॉलिटिक्स जमायला पायजे वो…
तुम्ही मुंबईला गेला होतात आणि एव्हडी झगमगीत दुनिया सोडून परत कसे काय आलात?
या माझ्या प्रश्नावरचं त्यांचं हे उत्तर होतं.
वय वर्षे सत्तरचे असतील…
पण तरुणाईची पोटतिडीक होती बोलण्यात
पॉलिटिक्स जमलंच पाहिजे.. नाहीतर या जगात तुम्ही जगूच शकत नाही…
आम्हाला जमलं नाही.. जगतोय कसेबसे…
नट व्हायचं फॅड ते कॉलेजमध्ये असताना लागलेलं..घरदार सोडून गेलो मुंबईला…
आम्ही दोघंतिघं.. मित्र एकाच ग्रुपचे…आता नट होऊनच परतायचं. असं ठरवलं होतं.
सगळय़ांना दाखवूच.
मी आलो परत तसाच. काम नाही काही नाही.
पॉलिटिक्स जमलं नाही आपल्याला…
बाकीच्यांनी केली ‘झेलगिरी’ आपल्याला नाही जमणार आयुष्यात.
काडीचीही अक्कल नाही अशा लोकांची कशी काय करायची हुजरेगिरी? हॅट.
लाथ मारली आणि आलो परत…
मग काय एका नगरसेवकाच्या ओळखीनं एका संस्थेत कामाला लागलो, बरं चाललंय.
पण पॉलिटिक्स नको…
नंतर एक संस्था काढली एका राजकारणी माणसाच्या मदतीनं. त्याचा वार्षिक निधी येतो
त्यावर बरं भागतं
पण हे पॉलिटिक्स नको वाटतं…
हां. आता मधूनमधून दिसतात आमच्यासोबतचे काही टीव्ही-सिनेमात…
ते काय, इथंही तेच करायचे, तिथंही तेच करतायत. वाटलं होतं, मुंबईला जाऊन हाजी हाजी करून अभिनयात फरक पडला असेल… पण… छे…
तेच तेच तसंच काम करतात…
मध्ये कुठलंच अ‍ॅवॉर्ड मिळाल्याचं ऐकलं…
आता यात काय नवल आहे.
अलीकडे पॉलिटिक्स आहे हे सगळं.
ते जमलं की सगळे अ‍ॅवॉर्ड मिळतात. त्याला टॅलेंट असलंच पाहिजे असं काही नाही.
आम्ही आपलं बरंय. नाटय़ स्पर्धेत भाग घेतो
परीक्षकांना खूश करतो. बक्षीस मिळवतो. (घेतो नाही.)
आपल्याला जन्मात जमणार नाही पॉलिटिक्स..
खोटा अभिनय..
नाहीतर काय? आमच्या समोर उभे रहा म्हणजे कळेल. अभिनय शिकावाच म्हणे…नाहीतर काय.. अहो, अभिनय असा कुठं शिकून येत असतो का…?
तो उपजतच असावा लागतो.
थोतांड वो सगळं.. कोर्स केला पायजे न काय काय…
आले ना कितीतरी शिकून काय केलं त्यांनी..?
अबिता बच्चनची सर आहे कुनाला
गेलंय पुढं कुनी त्यांच्या…?
बाजारगप्पा..
वाचलात.. मी थांबलो नाही
बॉम्बेला नाहीतर…
थेरं सगळी..
तीन-तीन चार-चार वर्ष घालवायची कुठं कुठं
अभिनय शिकत आणि कामं मागत फिरायची.
मग काय फायदा..?
मला तर प्रश्नच पडायचा
मला कोण शिकवणार…?
म्हणून मी या फंदात पडलोच नाही.
मी बरा आणि माझं बरं…
नकोच ते पॉलिटिक्स..
आता एक मुलगा म्हणतोय नट व्हायचं म्हणून
त्याला सांगितलंय.
पॉलिटिक्स शिकून घे.
तर मला म्हणतो,
‘‘अहो, ती निखळ कला आहे. पॉलिटिक्स कशाला?’’
आता मला सांगा त्याला काय कळणार यातलं पॉलिटिक्स…?

ता. क.
आठवतंय का कुणी…?
– मिलिंद शिंदे