Smita_Gondkar_Blog
महाराष्ट्रा… महाराष्ट्रा… महाराष्ट्रा… असा सर्व प्रेक्षकांचा आवाज कानात घुमत होता… पन्नास मीटरवर फिनिशलाईन दिसत होती… आम्ही पुरते दमलो होतो… दोन्ही हातातली ताकद जवळपास संपली होती… पण महाराष्ट्रासाठी पदक मिळवायचे हे एकच ध्येय होते… महाराष्ट्रा…महाराष्ट्रा… असे होणारे चिअरिंग नसानसात भिनले आणि एक कमालीची ऊर्जा आमच्यात संचारली… अचानक ताकद वाढली… तलवारीप्रमाणे सपासप आमचे हात चालू लागले आणि बघता बघता सर्वांना मागे टाकत आम्ही फिनीश लाईन पार केली… महाराष्ट्रासाठी पदक मिळविण्याची कामगिरी पार पडली अन् महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला… पण हा फिनीश लाईनपर्यंतचा प्रवास साधासुधा नव्हता… त्यासाठी अथक परिश्रम आणि मेहनत घ्यायला लागली होती…
आमच्या घरी प्रत्येकाला एक आर्ट आणि एक स्पोर्ट कम्पलसरी यायलाच हवं याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. माझ्या आजोळी सगळय़ाच मावश्या, मामा हे स्वीमर आहेत. त्यामुळे आजोळी एक भलामोठा स्वीमिंग पूलच आहे. तशी माझ्या वडिलांनाही स्वीमिंगची आवड असल्यानं आईलाही तिचं स्वीमिंग लग्नानंतर सुरू ठेवता आलं. आई लग्नानंतर स्वीमिंग कोच म्हणून काम पाहू लागली. ती मलाही स्वीमिंग क्लासला घेऊन जाऊ लागली. पण घर की मुर्गी दाल बराबर असं म्हणतात ना.. त्यामुळे आईकडून मी डायरेक्ट शिकलेच नाही. बाकी सगळय़ा मुली आईकडून स्वीमिंग शिकायच्या, पण मी मात्र ती कसं शिकवते हे चोरून पाहात पाहात माझी मीच शिकले. मी अगदी पाच-सहा वर्षांची असतानाच स्वीमिंग शिकले. स्वीमिंग रक्तातच होतं, त्यामुळे खरंतर ते शिकण्याचीही गरज नव्हती, असं म्हणायला हरकत नाही. आईच्याही हे लक्षात आलं की स्वीमिंग ही पोरगी लगेच शिकली. त्यामुळे हिनं कोणता तरी वेगळा खेळ शिकायला हवा म्हणून आईनं मी दुसरीत असताना मला जिम्नॅस्टिकला घातलं.
जिम्नॅस्टिकला गेल्यावर एकदा हॉर्सबॅकवरून उडी मारताना मी पडले आणि माझ्या हनुवटीला लागलं. मग मला शिकायचं नाही असं मी आईला सरळ सांगून टाकलं. यावर आईनं एवढंसं लागल्यानं काही होत नाही असं समजावत क्लास न सोडण्याबद्दल सांगितलं. मग मी रागाच्या भरात आईला म्हणाले, तू माझ्यासारखी उडी मार आणि पड, मग ठरवू ते काय करायचं ते… हे ऐकल्यावर आईला माझी काळजी वाटली आणि तिनं लगेचच जिम्नॅस्टिकचा क्लास बंद केला. जिम्नॅस्टिक मी थोडा काळच शिकले आणि मग सोडलं. हॉर्सबॅक अवघड आहे की काय म्हणून मला आईनं रोप मलखांब शिकायला पाठवले. मीसुद्धा उत्साहानं गेले, पण रोप मलखांब शिकवायच्या ऐवजी तिथले सर मला पळायलाच लावत होते. रनिंग मला अजिबात आवडत नाही. दोन आठवडे नुसते रनिंग आणि एक्सरसाईजेस करायला लावले आणि रोपवर चढायला शिकवलं नाही म्हणून मी कंटाळले. मग मी रोप मलखांबही सोडलं. तसंही लहान वयात मला काय करावं हे कळत नव्हतं. पण काय करायचं नाही हे मात्र क्लिअर होतं. माझं स्टेट लेव्हल स्वीमिंग चालूच होतं. स्वीमिंगमध्ये माझ्या स्पर्धा जिंकणं चालूच होतं. पण आई त्यावर समाधानी नव्हती. तिला मी काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं. तिनं मला विचारलं, की तुला स्वीमिंग सोडून दुसऱ्या कोणत्या खेळात इंटरेस्ट आहे का..? तेव्हा मी सांगितलं, मला कुंग फू शिकायचंय..! लहानपणी सुटीच्या दिवशी माझ्या काकासोबत ब्रुसलीचे सिनेमे बघणं हे ठरलेलं असायचं. त्याचे सिनेमे पाहून आपल्यालाही कुंग फू यावं असं मनापासून वाटे. आईनं संपूर्ण पुण्यात कुंग फू क्लासेसची विचारपूस केली. पण ज्युडो आणि कराटेशिवाय दुसरे कोणतेच क्लास पुण्यात नव्हते. मग मी ज्युडो शिकायला लागले. सलग पाच वर्ष मी ज्युडो खेळले. या पाच वर्षांच्या काळात मी नॅशनलपर्यंत खेळले. मला नेहमी नवीन आणि जगावेगळं शिकायची इच्छा असायची. त्यामुळे नवीन काही शिकण्याचा मी चान्स कधी सोडायची नाही. या पाच वर्षांत मी फिगर स्केटिंग आणि बीएमएक्स सायकलिंग इव्हेंट्स केले आणि त्यात यशस्वीही झाले, पण नॅशनल स्पोर्ट्समध्ये हे गेम्स नसल्यानं हे जास्त पर्सिव्ह केले नाहीत. फक्त ज्युडोच कंटिन्यू केलं. ज्युडो चालत असताना मग पुढे दहावी आली आणि माझा ज्युडोचा सराव सुटला.
दहावीच्या काळात माझं गाणं जसं बंद झालं तसं स्पोर्ट्सही बंद होतं. मग दहावीच्या सुटीमध्ये माझ्या एका मैत्रिणीनं मला रोइंग या स्पोर्ट्सबद्दल सांगितलं. ती रोइंग करत होती. रोइंग हा नौकानयनातला एक प्रकार आहे. मला रोइंगबद्दल कमालीचं आकर्षण निर्माण झालं आणि मी रोइंग शिकायला जाऊ लागले. पहाटे पाचला सीएमईच्या बोट क्लबवर जाऊन मी रोइंग शिकायला लागले. आपलं वय जसजसं वाढत जातं तशा आपल्या आवडीनिवडी क्लिअर होत जातात. मलाही कोणत्या खेळात आपण जायचं हे क्लिअर झालं. रोइंगची मला जास्त आवड निर्माण झाली. महाराष्ट्राच्या फोअर रोइंग टिम आणि स्कलिंगमध्ये मी खेळले. खूप प्राईजेस मिळवली. माझं रोइंग जोरात चालू असतानाच एक नवा खेळ भारतात आला. या खेळाचं नाव कयाकिंग. हा नौकानयनातलाच अजून एक क्रीडाप्रकार आहे. माझी निवड या नवीन खेळासाठी झाली. मला नेहमीच नवीन शिकण्याचा उत्साह असतो. मी आवडीनं कयाकिंग शिकू लागले. मी डेडिकेशननं, ज्येन्युअनली आणि सीरियसली रोइंग आणि कयाकिंग करू लागले. कयाकिंगमध्ये ताकद लागते. ती वाढवण्यासाठी मग वेगवेगळे एक्सरसाईजेस आम्ही करायचो. ज्युडोमुळे माझी स्ट्रेंथ चांगली होतीच, पण तरीही मला कोणत्याही ठिकाणी कमी पडायचं नव्हतं म्हणून मी कृष्णविद्या शिकले. कृष्णविद्या म्हणजे एन्शिएंट फॉर्म ऑफ इंडियन मार्शल आर्ट..! ही कृष्णविद्या भारतात फार कमी ठिकाणी शिकवली जाते. पुण्यातही ही विद्या शिकवली जाते, पण बऱ्याच लोकांना याची कल्पना नाही. पुण्यातील कृष्णविद्येचे गुरू गोडबोले सर यांच्याकडे मी ती शिकले. यामध्ये स्ट्रीट फाईट, सेल्फ डिफेन्ससोबत सगळा आखाडय़ातला व्यायाम असायचा, त्यामुळे ताकद अजून वाढली. याचा फायदा मला कयाकिंगमध्ये नक्कीच झाला.
पुढे बरीच वर्षे मी कयाकिंग केले. या काळात मी तीन नॅशनल गेम्स आणि भारतात वेगवेगळय़ा ठिकाणी बरेच इंटरस्टेट्स मीट्स खेळले. महाराष्ट्रासाठी मेडल्स मिळवले. महाराष्ट्राच्या कयाकिंग टिमची कॅप्टन झाले. आम्हा महाराष्ट्राच्या विरांगणांचा देशात दबदबा वाढू लागला आणि याची दखल नॅशनल लेवलपर्यंत घेतली गेली. माझ्यामधील कयाकिंगचे स्कील्स आणि ट्रेनिंग अ‍ॅबॅलिटी पाहून मला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स गोवा इथं आर्मीच्या जवानांना ट्रेंड करण्याचा बहुमान मिळाला. नंतर CRPF, Police force मध्ये जॉइन होण्याच्या ऑफर्स मला येऊ लागल्या. मीसुद्धा जॉइन करण्याच्या विचारात होते, पण नशिबात काहीतरी वेगळं होतं. मला अचानक अमेरिकेच्या जॉबची संधी आली आणि मला भारत सोडून जावं लागलं. त्या काळात आपल्या इथं स्पोर्ट्सबद्दल फारच उदासीनता होती. म्हणून मी अमेरिकेतला जॉब जॉइन करणं पसंत केलं. इंडियाकडून खेळण्याचं माझं स्वप्न राहून गेलं. पण अमेरिकेतल्या जॉबमध्ये मी इंडियाला रिप्रेझेंट करत होते हेही जास्त अभिमानाचं होतं.
कयाकिंगला आठ तास सराव चालायचा. या सरावामुळेच आता शूटिंगला सलग आठ आठ तास काम करताना अजिबात कंटाळवाणं वाटत नाही. तेव्हाच्या वर्क आऊटमुळे मला सध्या फार व्यायामाची गरज भासत नाही. मी अजूनही तेव्हाच्या व्यायामामुळे फिट आहे. पण फिट आहे म्हणून मला स्वस्थ बसवत नाही. मी रोज कार्डिओ आणि योगा करतेच. त्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही. प्रत्येक काम डेडिकेशननं करण्याची सवयसुद्धा खेळामुळेच लागली. महाराष्ट्राचा जर्सी घालून मिरवताना जो अभिमान वाटायचा तो काही वेगळाच होता. आजही मी माझा महाराष्ट्राचा ब्लेझर आणि जर्सी ट्रॅक सूट जपून ठेवलाय. कधी माझ्यातली एनर्जी कमी झाली असं वाटू लागलं, की मी ब्लेझर घालते आणि माझी एनर्जी पुन्हा मिळवते. स्पोर्ट माणसाला घडवतं. स्पोर्ट्समुळे मुलांमध्ये Team work, Dedication, Hope, Co-ordination, Confidence असे बरेच गुण आपोआप येतात. अपयश आलं तर ते पचविण्याची ताकदसुद्धा आपल्याला खेळातूनच मिळते. आयुष्यातल्या संकटांना कसं फेस करायचं हे आपण खेळ खेळताना आपसूक शिकतो. तेव्हा आपल्या स्वत:साठी एक कोणता तरी खेळ खेळायलाच हवा.. नाही का..??
सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा!!!
– स्मिता गोंदकर