एखाद्याच्या प्रेमात पडण्यासाठी कधी वर्षानुवर्ष लागतात. तर कधी एक क्षणही पुरेसा असतो. प्रेमात पडल्यावर संपूर्ण जग बदलतं असं म्हणतात. त्या व्यक्तीच्या भोवती दुसरी कोणी व्यक्ती आलेली आपल्याला सहन होत नाही. मोबाइलवर त्याच नाव बघितलं तरी तुमच्यावर चेहऱ्यावर नकळत हसू येतं. काहींच्या तर हृदयाचे ठोकेही वाढतात. हा अनुभव काही निराळाच असतो. हे क्षण अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या वाट्याला आले. तिची ही क्रश स्टोरी अनेकांना आपलीशी वाटणारी आहे.

कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना मला एक मुलगा आवडायचा. त्याचं नाव सुकीर्त…. मुळची मी बारामतीची पण पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेले. लहानपणापासूनच नाटकांची आवड असल्यामुळे फर्ग्युसनमध्ये असताना मी जागर या नाट्यसंस्थेत सहभागी झाले. तिथेच मला हा मुलगा दिसला. त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाट्य शिबिर केलं होतं. तो येणार म्हणून त्याच्या नावाची तेव्हा खूप हवा निर्माण झाली होती. त्यावेळी सोशल मीडियाचा काहीच वापर नव्हता. त्यामुळे तो कसा दिसतो ते मला माहिती नव्हतं. तू आताच आली आहेस, त्याच्याकडून तुला खूप शिकायला मिळेल, असं मला बरेचजण सांगत होते. चित्रपटातल्या कथेप्रमाणे सर्वकाही घडत होतं आणि मीसुद्धा त्याला भेटण्यासाठी उत्सुक झाले होते. एखाद्या हिरोसारखी इमेज मनात तेव्हा तयार झाली होती आणि एकदा तालीम सुरु असताना सुकीर्तची एण्ट्री झाली.

डोळ्यावर चष्मा, भुरकट केस, चेहऱ्यावर सुंदर हास्य असा एक नम्र मुलगा आत आला. सगळे त्याला बघून इतके खूश झाले. एखादी व्यक्ती सगळ्यांना आवडते म्हणजे नक्कीच त्याच्यात काहीतरी असणार हे माझ्या मनात आलं. नेमकं नंतर तो माझ्याशेजारीच येऊन बसला तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके वाढले. त्याने आपल्याशी बोलावं असं राहून राहून मला वाटत होतं. पण, तो अगदी त्याच्या विरुद्ध होता. अतिशय साधा, प्रत्येक वाक्याला विनोद करायचे असा त्याचा स्वभाव. तो संपूर्ण दिवस त्याच्याकडे बघण्यातच गेला. दुसऱ्या दिवशी पण मी त्याला लांबून बघत होते. ते बहुदा त्याला कळलं आणि तो स्वतःच माझ्याशी बोलायला आला. सगळे त्याला दादा वगैरे म्हणायचे. पण मला कधीच त्याला दादा म्हणावंस वाटलं नाही. मी पूर्णपणे त्याच्यावर लट्टू झाले होते. त्याचा सेन्स ऑफ ह्यूमर कमालीचा होता. आपल्याला खूप काही कळतं असा उगाचच खोटा आविर्भाव तो कधीच दाखवायचा नाही. रात्री नाटकाची तालीम झाल्यानंतर मुलं मुलींना बाइकवरून सोडायची. तेव्हा त्याने मला घरी सोडावं असं वाटायचं. पण कोणी भलताच मुलगा मला घरी सोडायचा. त्यानंतर माझी बारीवीची परीक्षा आल्याने एक मोठा गॅप गेला. नंतर पुन्हा आम्ही एका नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलो. तेव्हा माझ्यावरही जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा तो नेहमी माझ्या पाठीशी असायचा. माझं कौतुक करायचा आणि त्यादरम्यान आम्ही एकमेकांचे मित्र झालो. तेव्हा मग तोच मला बाइकवरून सोडायला यायला लागला. आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र आलो की प्रत्येकजण नाटकातले विनोद सांगायचा. त्याचे विनोद ऐकणं ही इतरांसाठी एक पर्वणीच असायची. पण मला मात्र त्याचे विनोद कधीच कळायचे नाहीत. तेव्हा तो मला ते विनोदसुद्धा समजावून सांगायचा.

एकदा मी त्याला म्हटलं मलाही बाइक चालवायला शिकायचं आहे. तो माझ्या मागे बसला होता आणि मी ब्रेक दाबला. त्यावर तो जोरात माझ्यावर आदळला. ते जे काही फिलिंग होतं ते मी कधीच विसरू शकत नाही. तेव्हा मी हरपून बसले आणि पुढे बाइक शिकणं झालंच नाही. या घटनेनंतर क्रशचं रुपांतर प्रेमात झालं. आम्हाला एकमेकांचा खूप सहवास मिळाला. मी स्वतःहून त्याच्याकडून नंबर घेतला. त्याला नेहमी फोन करायचे. पण त्याला कळत नव्हत की मी त्याच्या प्रेमात पडलेय. मला त्याच्या एकट्यासोबत चित्रपट बघायला जायचं असायचं. पण त्याउलट हा सर्व मित्रमंडळींना घेऊन यायचा. एकदा मला तो म्हणाला की, ‘हा येत नाहीये, ती पण येत नाहीये…’ यावर ‘ठीक आहे ना..’ असं मी उत्तर दिलं. पण त्याच्या मनात मात्र वेगळंच होतं. ‘मग काय करायचं आपण नाही जायचं का?’ असं त्याने विचारल्यावर मी घाबरतच त्याला, ‘आपण जाऊयात का? असा प्रश्न विचारल्यावर तो एकदम शॉक झाला. ‘आपण दोघंच जायचं फिल्मला..?’ असा प्रतिप्रश्न त्याने मला केला. पण हो नाही म्हणता म्हणता शेवटी आम्ही दोघंच चित्रपट बघायला गेलो. तब्बल तीन तासांचा चित्रपट होता. पण माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं. अशी आमची मैत्री वाढत गेली.

हळूहळू माझ्या लक्षात आलं की त्याच्या बाइकवर दुसरी कोणती मुलगी बसली तरी माझी चिडचिड व्हायची. मी किती बालिश वागतेय असं त्याला वाटू लागलं. आमच्यामध्ये भांडण सुरु झाली. माझी कुचंबणा होत होती. मी त्याच्यावर प्रेम करतेय हे मला सांगता येत नव्हतं. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच येऊ शकत नाही. पण, तो खूप हुशार निघाला. कारण, त्यालाही मी आवडत होते हे मला खूप उशीरा समजलं. आपण कोणाच्या मागे जायचं नाही, आपल्या अॅटिट्यूडमध्ये राहायचं असं त्याने ठरवलं होतं. मी मात्र बालिशपणे वागत होते. आमच्यामध्ये किरकोळ गोष्टींवरूनसुद्धा भांडण होत होती. तरीही आम्ही एकत्र होतो. मला अजूनही तो दिवस आठवतोय ९ फेब्रुवारी एकदा असचं बोलता बोलता आम्ही एकमेकांवरच प्रेम सांगून टाकलं. दोघांनीही ठरवून प्रपोज वगैरे काही केलं नाही. पण आपण एकमेकांना खूप जास्त आवडतो आणि आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत, अशी कबुली आम्ही दिली. तेव्हाचा तो क्षण आणि त्यानंतर बरोबर ८ वर्षांनी मुहूर्त वगैरे काहीही न बघता त्याच दिवशी ९ फेब्रुवारीला आम्ही लग्न केलं…. सो नाऊ ही इज माय हसबण्ड!!!

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com