सध्या मालिकांच्या माध्यमातून नवनवे चेहरे आपल्याला छोट्या पडद्यावर पाहायला मिळताहेत. आजचा आपल्या भेटीला आलेला अभिनेता तसा नवा राहिला नाही. पण त्याच्या नव्या लूकमुळे ज्याला आपण आधी टीव्हीवर पाहायचो तो अभिनेता हाच आहे का, असा प्रश्न सध्या अनेकांना नक्कीच पडला असेल. मी बोलतेय छोट्या पडद्यावरील अभिनेता अक्षर कोठारी याच्याबद्दल. ‘कमला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता अक्षर कोठारी आता पुन्हा एकदा ‘चाहूल’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविताना दिसत आहे. अक्षर या नव्या मालिकेमध्ये सर्जेराव, सर्जा आणि सजय अशा तिहेरी भूमिकेत दिसतो आहे. कमलामध्ये बिअर्ड लूकमध्ये तरुणींची मने जिंकणारा अक्षर सध्या त्याच्या क्लिन शेव्ह लूकमुळे आणखीनच चर्चेत आला आहे. तर अशा या अभिनेत्याच्या क्रशबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

शाळेत असताना माझं एक क्रश होतं. आम्हाला निकीता नावाची टिचर होती. तिच माझं पहिलं क्रश. शाळेत असताना क्लासमध्ये मी तिच्याकडे एकटक बघत बसायचो. माझं कायम तिच्याकडं लक्ष असायचं. ती कशी बोलतो, वागते याकडे मी निरखून बघायचो. तिचे केस मला खूप आवडायचे. माझं वर्गात पूर्णपणे दुर्लक्ष असायचं. हे हळूहळू तिच्याही लक्षात आलं होतं. नंतर अशी वेळ आली की, माझ्या मित्रांनाही याबद्दल कळलं. मग सर्वजण माझी चेष्टा करायला लागले. लंच ब्रेक असायचा, ती जेवायला बाहेर जायची. तेव्हा आम्ही सगळी मुलं झाडाखाली बसायचो. जेवण झाल्यावर मी शाळेच्या गेटजवळ असलेल्या कट्ट्यावर जाऊन बसायला घाई करायचो. कारण, ती त्याच गेटमधून आत यायची. ती कधी येतेय त्याची मी वाट बघत बसायचो. सुरुवातीला तिने मी गेटवर तिची वाट बघायचो हे तिने नोटीस केलं नव्हतं. पण हळूहळू तिला कळायला लागलं की मी तिचीच वाट बघत तेथे बसलोय. आम्ही गेटवर बसलेलो असणार हे अपेक्षित धरूनच मग ती यायला लागली. नंतर नंतर आमच्याकडे बघून हलकसं हसून ती पुढे जायची. त्यानंतर मला अनेक मुली आवडल्याही. मात्र, माझं ज्या व्यक्तीवर क्रश होतं त्याच व्यक्तीने ते नोटीस केल्याने माझं हे क्रश खास होतं. बाकीच्यांनी कोणीच असं मला नोटीस न केल्यामुळं त्यांच्याबद्दलचे विचार कालांतराने संपले. मी जेव्हा पासआऊट झालो तेव्हा तिला कळलं की मला अभिनयात रुची आहे. मी शाळेत असताना कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचो, त्यावेळेस एका कार्यक्रमानंतर ती मला लायब्ररीमध्ये भेटली आणि तिने तिच्या पर्समधून एक डायरी काढून माझी सही घेतली होती. ती मला म्हणाली होती की, लक्षात ठेव आयुष्यात तुझा ऑटोग्राफ घेणारी मी पहिली व्यक्ती आहे. तिथे त्या स्टोरीचा ‘दी एण्ड’ होता. त्यापलीकडे माझ्याही काही अपेक्षा नव्हत्या आणि तिच्याही नसणार. शेवटी आमचं नातं एक टीचर आणि स्टुडण्टचं होतं. ती माझ्या आयुष्यातली पहिली व्यक्ती जिला मी सही दिली. त्यामुळे तिलाही मी लक्षात राहिन आणि माझ्याही ती लक्षात राहिल!

चैताली गुरव; chaitali.gurav@indianexpress.com