मालिका पाहणा-या मुलींना त्याचा चेहरा कमालीचा इनोसंट वाटतो. ‘कसला गोड आहे हा’ हे शब्द मुलींच्या ओठांवर रेंगाळतात.  ‘का रे दुरावा’ या मालिकेतील जय म्हणजेच सुयश टिळक सध्या तरुण मुलींमध्ये कमालीचा लोकप्रिय झालाय. ‘का रे दुरावा’, ‘पुढचं पाऊल’, त्यानंतर ‘स्ट्रॉबेरी’ हे नाटक आणि ‘सख्या रे’  या मालिकेतून सुयशने त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन केले. अनेक मुलींच्या मनावर राज्य करणारा सुयश आपण ब-याचदा प्रेमात पडल्याचे सांगतो. प्रेमावर पूर्ण विश्वास असणा-या सुयशच्या मते प्रत्येकाने एकदा तरी प्रेमात पडायलाच हवे. चला तर मग जाणून घेऊया, हा सतत प्रेमात पडायला सांगणारा सुयश टिळक आपल्याला त्याच्या क्रशबद्दल सांगतोय तरी काय….

प्रेम ही अशी गोष्ट ही जी वारंवार होत असते. मुळात प्रेम या संकल्पनेवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि पुन्हा पुन्हा होणा-या प्रेमावरही माझा तितकाच विश्वास आहे. एकदा प्रेम झालं की पुन्हा होऊच शकत नाही असं काही नाहीये, असं मला वाटतं. एखाद्यात तुम्ही गुंत़त गेल्यानंतर, विविध पैलूने विचार करू लागता. जसजशी तुमची विचार करण्याची पद्धत बदलते, तुम्ही अधिक परिपक्व होत जाता तसे तुमचे प्रेमाचे फंडे, विचार करण्याच्या गोष्टीही बदलत जातात. ज्या गोष्टी दहा वर्षांपूर्वी आवडायच्या त्या दहा वर्षांनंतरही आवडतीलच असं नसतं. मला वाटतं प्रत्येकाचं पहिलं प्रेम काही ना काही असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असं काही तरी असतं की त्यावेळी सतत वाटत असतं की, ‘ही मुलगी आपल्यासाठी करेक्ट आहे. ही आपल्या आयुष्यात आली पाहिजे होती. आपण तेव्हा काहीतरी विचार केला असता तर काहीतरी झालं असतं’. अशी मुलगी माझ्या आयुष्यातही होती. माझी एक मैत्रीण आहे जी अगदी कॉलेजपासून माझ्या आयुष्यात आहे. ती आजही माझ्यासाठी तितकीच लाडकी आहे. तिचं लग्न होऊन आता दोन-तीन वर्ष उलटली असतील. पण, ती नेहमीच माझी बेस्ट फ्रेण्ड राहील. मी काहीही न बोलता तिला माझ्या मनातलं कळायचं. मी तिच्याशी माझी प्रत्येक गोष्ट शेअर करायचो. त्यानंतर मला अशी कुणी मुलगी सापडलीच नाही. जिच्यासोबत माझं त्या लेव्हलचं शेअरींग झालं असेल. आपल्या मनातलं काहीही न सांगता कळेल अशी कुणी आलीच नाही. आईनंतर आपल्या मनातलं सगळं काही ओळखणारी ती दुसरी व्यक्ती असते. माझ्यासाठी ती तशीच होती. मी आजही कधी खूप जास्त डाउन असलो किंवा मला अगदीच काही शेअर करावसं वाटलं तर मी तिला फोन करतो. आमची मैत्री खूपच घट्ट आहे. मधला काळ असा येऊन गेला जेव्हा आमच्यात अजिबात संवाद होत नव्हता. आमच्या वाटा वेगळ्या होत्या. त्याचवेळी आम्ही रिलेशनशिपमध्येही होतो. माझी फर्स्ट लव्हवाली रिलेशनशीप तिच्यासोबत होती. मात्र, त्यावेळेला काही गोष्टी जमू शकल्या नाहीत. कॉलेज संपल्यानंतर तिने माझ्याशी बोलणं सोडून दिलं होतं. मी खूप बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण काहीच ठीक होत नव्हतं. एक व्यक्ती जिच्याशी मी सगळं शेअर करायचो ती व्यक्ती अचानक माझ्या आयुष्यात नसल्यासारखी झाली. त्यानंतर जवळपास एक-दोन वर्षांनी माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आल्याचं तिला कळल्यावर ती स्वतःहूनच माझ्याशी बोलायला लागली. पण, त्यानंतर अशा ब-याच मैत्रीणी माझ्या आयुष्यात येऊन गेल्या आणि मला बरेच क्रशेस झाले. ब-याच वेळेला वाटलं की आपण प्रेमात पडतोय वगैरे. पण जे पहिलं प्रेम असतं ते नेहमीच अबाधित असतं असं मला वाटतं.

कॉलेजमध्ये असताना माझ्या ग्रुपमधल्या सर्व मित्रांना मीच पहिलं लग्न करणार असं वाटायचं. पण आज परिस्थिती वेगळीच आहे. त्यांची लग्न झाली असून काहींना मुलं आहेत. मी अजूनही सिंगल आहे. मला ते सगळं आठवलं की खूप भारी वाटतं. माझं लग्न लवकर होणं इम्पॉसिबल आहे, असं मी त्यांना चॅलेंज दिलं होतं. माझ्यासारख्या मुलासोबत आयुष्य काढण्यासाठी एखादी मुलगी तयार होणं मुळात अवघड आहे. कारण मी स्वत:च्याच धुंदीत असणारा मुलगा आहे. आमची फार वेळा यावरून मजामस्ती चालते. माझ्या मते प्रत्येकाने प्रेमात पडायला हवं. कारण त्यानंतर तुम्ही अधिक परिपक्व होत जाता. जे लोक प्रेमात पडले आहेत किंवा ज्यांनी ब्रेकअप अनुभवलेले आहेत त्यांना अनेक गोष्टी उलगडत गेल्या असतील. आपल्याला ब-याच गोष्टी नंतर कळतात, ब-याच गोष्टी आपल्याला अनुभवातून शिकायला मिळतात. आपण इमोशनली स्टेबल होतो. मी खूप आनंदात आहे की, आजही माझ्या सर्व मैत्रीणी माझ्याशी तशाच वागतात. आमची मैत्री आजही तशीच कायम आहे.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com