मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना, अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना…. हे शीर्षक गीत कानावर पडलं की सर्व तरुण मुलांच्या नजरा आपसुकच टेलिव्हिजनकडे वळतात. त्यामागचं कारणही तसंच आहे. या मालिकेत मानसीची व्यक्तिरेखा साकारणारी मयुरी देशमुख ही त्यामागचे कारण आहे. मूळची डेंटिस्ट असलेली मयुरी कलाक्षेत्राकडे वळली आणि तिने सर्वांनाच प्लेझंट सरप्राइज दिलं. नाटक, मालिका यातून मयुरीने तिचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे की आज तिच्या वागण्याबोलण्याचं प्रमाण दिलं जातं.  खुलता कळी खुलेना या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेल्या मयुरी देशमुखच्या क्रशबद्दल जाणून घेऊया..

माझे क्रशेस खूप झाले आहे. शाहरुख, सलमान अशी खूप मोठी लिस्ट होती. पण, त्यातील आठवणीतलं आणि रंजक असं एक क्रश होतं. मी डेटिंस्ट कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेत होते. पहिलंच वर्ष होतं. त्यावेळी मला अभिषेक बच्चनच्या प्रिमीयरला जाण्याची संधी मिळाली होती. त्याचा रगेट लूक, टॉल, डार्क, हॅण्डसम यामुळे तो मला फार आवडायचा. अमिताभ बच्चन यांच्या विरुद्ध चित्रपटाचा प्रिमीयर होता. तेव्हा मला अभिषेकसोबत फोटो काढण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी सेलेब्ससोबत इतक्या सहज फोटो काढायला मिळायचे नाहीत. ही जवळपास सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यासोबतचा फोटो मी संपूर्ण कॉलेजमध्ये मिरवला. सगळेच जण विचारात पडलेले की हिने याच्यासोबत फोटो कसा काढला. कारण, तेव्हा माझा या क्षेत्राशी काहीच संबंध नव्हता. त्याच्यानंतर पुढचे दोन-तीन दिवस मी अभिषेकसोबत फोटो काढलाय याच धुंदीत होते. फोटोत बघितल्यावर मला मनापासून वाटायचं की आम्ही दोघंही एकत्र खूप छान दिसतो. मग मी तो फोटो माझ्या आजीला दाखवला. आजी बघ कसा वाटतो फोटो.. आजीला काहीच माहित नाही कोण हिरो आहे हा.. आपल्या आजीतर टिपीकल असतात. तिने मला एकच प्रश्न विचारला हा मराठा आहे का? मी म्हणाले हो.. मराठा आहे. याचं नाव अभिषेक ठाकरे आणि मी याच्याशीच लग्न करणार आहे. अजूनही टीव्हीवर अभिषेक दिसला की मी आजीला चिडवते. हा बघ अभिषेक ठाकरे .. हा मराठा आहे आणि मी याच्याशी लग्न करणार आहे.

शाळेत असताना मी आणि माझ्या मैत्रिणीला एक मुलगा फार आवडायचा. अगदी निष्पाप असं आमचं क्रश होतं. तो प्रत्येक गोष्टीत उत्तम होता. एक आयडियल मुलगा कसा असावा अगदी तसाच तो होता. लोकांना मदत करणं, अभ्यासात हुशार, खेळामध्येही तो पुढे होता म्हणजे तो प्रत्येक गोष्टीत पुढे होता. त्या क्रशमधून आम्हाला प्रेरणा मिळाली होती. त्याच्यामुळे का होईना पण आम्ही स्पोर्ट्समध्ये वगैरे सहभाग घ्यायला लागलो होतो. जिथे जिथे आम्ही कमी पडत होतो ते आम्ही करण्याचा निर्णय घेतला. पण कालांतराने आम्ही वेगळे झालो. त्याची ट्रान्सफर झाली आणि पाच-सहा वर्षानंतर मला कळलं की त्याला मी आवडायचे. त्याच्या पाच वर्षानंतर मला त्याला भेटण्याचा योग आला. तब्बल दहा वर्षानंतर मी त्याला भेटणार होते. त्यामुळे मनात एक उत्सुकता होती. कारण आम्ही दोघंही एकमेकांना आवडायचो. मग भेटल्यावर काय होईल? चित्रपटांप्रमाणे आम्हीही भेटल्यावर काहीतरी भन्नाट होईल अशी अपेक्षा होती. अखेर आम्ही भेटलो. पण, आम्ही दोघंही बदललो होतो. तो पूर्वीसारखा अजिबात नव्हता.  त्यामुळे भेटल्या भेटल्या पहिली गोष्ट ही झाली की, माझ्या मनातला तो क्रशचा बबल फुटला. त्यानंतर आम्ही अगदी नॉर्मल गप्पागोष्टी मारल्या. मी घरी आले आणि आयुष्यातलं एक सत्य कळलं. क्रश किंवा आकर्षण असो या गोष्टी किती गंभीरपणे घ्यायच्या ते आपल्यावर असतं. खरं आयुष्य आणि स्वप्नातील दुनिया ही वेगळी असते. पण, याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण त्याच्यामुळे  मला विविध गोष्टी करण्याची प्रेरणा मिळाली. पण, हे तिथपर्यंतच मर्यादित होतं. कारण दहा वर्षानंतर मी ज्या व्यक्तिला भेटले तो पूर्ण वेगळा होता. मला तेव्हा स्वतःवरच विश्वास बसला नाही की माझं या व्यक्तीवर क्रश होतं.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com