युवा पिढीच्या गोष्टी, मित्र–मैत्रिणींशी, कुटुंबियांशी असलेले त्यांचे नातेसंबंध आधुनिक पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न झी युवा वाहिनीवर केला जातोय. या वाहिनीवरील तरुणाईला अगदी साजेशी अशी मालिका म्हणजे ‘लव्ह लग्न लोचा’. या मालिकेतून रुचिता जाधव हा नवीन चेहरा आपल्या भेटीला आला. ग्लॅमरस तसेच स्वतःच्या अटींवर आपलं आयुष्य जगणाऱ्या ‘काव्या’ची भूमिका रुचिता जाधव या मालिकेमध्ये साकारते आहे. तिच्या सौंदर्यावर आजच्या घडीला अनेक मुलं फिदा आहेत. सध्या अगदी सुडौल बांधा असणाऱ्या रुचिताचे कधी एकेकाळी ९० किलो इतके वजन होते. त्यामुळेच कोणताही मुलगा आपल्या प्रेमात पडूच शकत नाही, अशी भावना असणाऱ्या रुचिताच्या क्रशस्टोरी बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

माझ्या आयुष्यात आजवर खूप क्रश झालेत पण माझ्यावर कुणाचं क्रश झालं असेल असं मला वाटत नाही. याचं कारण एकेकाळी माझं वजन ९० किलो होतं आणि मला चष्मासुद्धा होता. सात वर्षांपूर्वी मी इतकी जाड होते की शॉपर्स स्टॉपमधले अतिजाड लोकांसाठीचे कपडेसुद्धा मला व्हायचे नाहीत. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना मला अनेकदा क्रश झालं. माझ्या ग्रुपमधल्या प्रत्येक मुलीचा बॉयफ्रेंड होता. पण, ग्रुपमध्ये मी एकमेव अशी मुलगी होते जिचा कॉलेज लाइफमध्ये बॉयफ्रेंड नव्हता. केवळ मी जाड असल्यामुळे माझ्या आयुष्यात कोणीच मुलगा आला नाही. फर्ग्युसन कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मी टवाळक्या बऱ्याच केल्या. त्यावेळी कॉलेजमध्ये एक मुलगा करिझ्मा गाडी घेऊन यायचा. त्याच्यावर माझं क्रश होतं. बारावीच्या परीक्षेवेळी तो माझ्या मागे बसला होता. जर्मनचा पेपर चालू असताना त्याने मला रुचिता रुचिता….. म्हणून हाक मारली. मी जाड असल्याने ज्याने माझ्याकडे अकरावी, बारावीला साध वळूनही बघितलं नाही. त्याला माझं नाव माहितीये हे कळल्यावर मला धक्काच बसला. त्याला एका प्रश्नासाठी माझी मदत हवी होती. पण माझं नाव त्याला माहितीये या विचारात मी इतकी गुंतले की त्याला मदत करणं राहूनच गेलं. माझ्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा ठरला. कारण ९० किलो वजन असलेली एक मुलगी जी फक्त चार मैत्रिणींसोबत फिरायची तिला एका हॅण्डसम मुलाने हाक मारली होती. हीच बाब माझ्यासाठी खूप होती. यामुळे प्रेरित होऊन मी नंतर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीनाकाही कमतरता असते. कोणी दिसायला सुंदर नसतं तर कोणी शरीरानं बेढब असतं. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य नेहमीच महत्त्वाचं असतं. हे जर प्रत्येकाला कळलं तर जगणं नक्कीच सुखकर आणि सुंदर होईल.

चैताली गुरव- chaitali.gurav@indianexpress.com