सतत गॅरीच्या नावाचा जप करणारी शनाया म्हणजेच रसिका सुनील धबडगांवकर कमी वेळातच महाराष्ट्रातील घरांमध्ये प्रसिद्ध झाली. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील नवरा बायकोच्या गोड संसारात येणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीची भूमिका ती साकारतेय. मालिकेतील तिची भूमिका खलनायिकेची असली, तरी खऱ्या आयुष्यात मात्र रसिकाचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने तिने सर्वांनाच आपलेसे केले आहे. सहाजिकच तिच्या या स्वभावामुळे तिचा मित्र- परिवारही मोठा असणार. मालिकेत गॅरीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारी शनाया म्हणजेच रसिकाही कोणाच्या तरी प्रेमात पडली होती. पण तिचे पहिलं क्रश मात्र फारसं कोणाला माहित नाहीये. आपल्या या अल्लड प्रेमाबद्दल सांगताना ती काहीशी भूतकाळात रमून गेली. चला तर मग जाणून घेऊया तिचं पहिलं क्रश होतं तरी कोण…
वाचा : #SairatMania : ‘त्या’ झिंगाट आठवणींना नव्यानं उजाळा…
मला लहानपणापासूनच सोनू निगम खूप आवडायचा. त्यावेळी एकदा सारेगमप लिटिल चॅम्पसमध्ये सोनू निगमचे वडील आले होते. तेव्हा मी सगळ्यांना टीव्हीवर माझे सासरे आलेत, असं सांगत सुटले होते. त्यामुळे सोनू निगम हा माझा ऑलटाइम क्रश आहे. याशिवाय मी दुसरीत असताना आणखी एक क्रश झालं होतं. खरंतर क्रश होण्याचं हे काही वय नाही पण माझं झालं. मी शिकण्यासाठी एक वर्ष अमेरिकेला गेले होते. तिथे ब्रँडन नावाचा एक मुलगा माझ्या वर्गात होता. माझं हे पहिलंवहिलं क्रश होतं. विशेष म्हणजे संपूर्ण वर्गात ब्रिटिश अॅक्सेन्टमध्ये बोलणारा तो एकमेव मुलगा होता. केवळ याच कारणामुळे तो मला खूप आवडायचा. वर्गात आम्हाला वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी दिले जायचे. तेव्हा प्लीज ब्रँडनच माझा पार्टनर असू दे, मला त्याच्यासोबत खेळायचंय, असं मी मनात म्हणायचे. बाकी माझ्या आयुष्यात फार काही क्रश झाले नाहीत. मी कोणाच्या मागे लागण्याऐवजी मुलंच माझ्या मागे लागायची. त्यामुळे याबाबतीत मी फार काही प्रयत्न केले नाहीत.
चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 1:05 am