दिलीप ठाकूर

हा एक ग्लॅमरस टीझर जणू….
तुम्ही सध्या रिंकू राजगुरुचे मॉडर्न रुपातील फोटो सोशल मिडियात पाहतच असाल. ‘सैराट ‘च्या यशाने तिची ग्रामीण नायिका अशी एस्टॅब्लिश झालेली इमेज मागे सारण्याचा हा प्रयत्न आहे हे एव्हाना चांगलेच लक्षात येतेय. आर्ची म्हणून ती लोकप्रिय तर झाली, पण शहरी मनोरंजक चित्रपटात भूमिका साकारताना आपल्यातील असा बदल व्यावसायिक गरज आहे. तात्पर्य, पहिले लक्ष्य ग्लॅमर आणि मग त्यामुळे शहरी चित्रपट मिळण्याची अपेक्षा/शक्यता….

सोशल मिडिया/फिल्मी पार्टी/प्रीमियर/पेज थ्री/इव्हेन्टस/रेड कार्पेट असा सगळीकडे ग्लॅमरचा इंद्रधनुष्य रंग दिसतोय त्यावरुनच येथे व्यक्त होतोय…

अमृता खानविलकरचा फॅशन सेन्स आणखीन छान वाढलाय असे तिच्या प्रत्येक नवीन इव्हेन्टसमधील अगदी एण्ट्रीत पटकन लक्षात येतेच. तिने जणू प्रत्येक नवीन इव्हेन्टसमध्ये आपण आधुनिक आणि लेटेस्ट फॅशनच्या ड्रेसमध्ये दिसलं पाहिजे असा पण केलाय. तात्पर्य, पहिले लक्ष्य ग्लॅमर….

सोनाली कुलकर्णीच्या आत्मविश्वासात ‘हिरकणी ‘च्या यशाने चांगलीच वाढ झाली असून आता ती अगदी नविन फॅशनच्या ड्रेसमध्ये अधिकच कम्फर्ट वावरतेय असे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हा इव्हेन्टस असो अथवा विक्की वेलिंगकरचा प्रीमियर असो, त्यात पटकन लक्षात येते. चित्रपटाचे यश हेदेखील ग्लॅमरला पूरकच असते. तो चालला की फॅन्सही आपल्या आवडत्या स्टारची फॅशन फॉलो करतात.

सई ताह्मणकरचा फोटो सेशनचा धडाका अगदी जबरदस्त आहे. साधारण तीन चार दिवसांत तिचे नवीन स्टाईलच्या ड्रेसमध्ये आकर्षक ग्लॅमरस फोटो सेशन सोशल मिडियात हमखास दिसते. त्यासाठी ती न कंटाळता, न थकता वेळ देतेय आणि आपले फ्रेशपण कायम टिकवून आहे. यातही पहिले लक्ष्य ग्लॅमर हेच अधोरेखित होतेय. आपण सतत ‘दिसत राहायला हवे ‘ हा मनोरंजन क्षेत्राचा एक गुण आहेच.

श्रृती मराठे पारंपरिक असो अथवा मॉडर्न असो, दोन्ही प्रकारच्या ड्रेसमध्ये प्रेझेन्टटेबल असते. फोटोत आपण नक्कीच ग्लॅमरस दिसणार याचा तिला कमालीचा आत्मविश्वास आहे हे पटकन लक्षात येते. मनाची सुंदरता एकूणच देहबोलीत दिसते…. पुन्हा तेच, पहिले लक्ष्य ग्लॅमर.

कतरिना कैफसोबत एका अॅडमध्ये सहभागी असल्याचा पूजा सावंतच्या लूकमध्ये सकारात्मक परिणाम दिसतो. हॉट वाटाव्या अशा पोझेस ती डिसेन्डपणे देतेय. हे खूप अवघड असते. शॉर्ट्समधील फोटो पोझ श्लीलता/अश्लितला याच्या बॉर्डरवर असते. पूजा सावंत तसे काहीही वावगे ठरणार नाही याची काळजी घेतेय हे फोटोत दिसते.

मराठी चित्रपटसृष्टीने थीमपासून देशविदेशातील चित्रपट रिलीजपर्यंत प्रगती केल्याची चर्चा कायमच होत असते. अगदी मराठी चित्रपटाच्या निर्मितीची संख्या वाढलीय यापासून विदेशात मराठी चित्रपटाच्या शूटिंगचे प्रमाण वाढलेय, पूर्वी कोल्हापूरला ज्या सहजतेने मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणे येणे होई त्यापेक्षाही जास्त उत्साहात इंग्लंडला आता मराठी चित्रपटाच्या शूटिंगचा फड रंगतोय. त्याची भरपूर चर्चा होतेय.

याच प्रगतीत आणखीन एक कौतुकाचा फंडा म्हणजे आजच्या मराठी अभिनेत्रींमध्ये एक मॉडर्न गुण दिसतोय. तो म्हणजे ‘पहिले लक्ष्य ग्लॅमर….

सिनेमाच्या पडद्यावर आपण व्यक्तिरेखेनुसार दिसणार आहोतच. त्यात जर ‘गर्लफ्रेन्ड ‘ आणि ‘गर्ल्स ‘ यासारखा आजच्या युथची भाषा/संस्कृती/शैलीचा चित्रपट असेल तर ग्लॅमरस रुपाची संधी आहेच. ‘हिरकणी ‘, ‘फत्तेशिकस्त ‘सारखे ऐतिहासिक अथवा ‘धुरळा ‘सारखा राजकीय चित्रपट असेल तर आपले मूळ व्यक्तिमत्व बाजूला ठेवून त्या व्यक्तिरेखेनुसार आपण असायला हवे हे अगदी स्वाभाविक आहे. पण पडद्यावरचे रुप म्हणजे प्रत्यक्षातील ओळख नाही/नसते.

पहिले लक्ष्य ग्लॅमर…. ही वृत्ती आणि दृष्टी एस्टॅब्लिश झालीय ती प्रत्यक्षातील काही गोष्टींनी! ताजे उदाहरण महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हा रात्री उशिरापर्यंत रंगलेला इव्हेन्ट! यासाठी आलेल्या प्रत्येक अभिनेत्रीने कळत नकळतपणे आपण चांगलेच दिसायला हवे याचा माईंड सेट पक्का करुन ड्रेसची निवड केली असावी. अर्थात हे खूप चांगलेच आहे. आपण पंचतारांकित हॉटेलमधील एका ग्लॅमरस इव्हेन्टसमध्ये सहभागी होतोय, तेथे सीसीटीव्ही असणार, तेथे भरपूर मिडिया असणार, फ्लॅश उडणार, अनेक बाईटस द्यायचेत, सेल्फीसाठी आग्रह होणार, कोणी पटकन जवळ येत फोटो काढणार, एखादा फोटोग्राफर आणखीन कोणी अभिनेत्रीसोबत फोटोसाठी उभे करणार, हे फोटो सोशल मिडियात पोस्ट होणार, जगभर दिसणार, या इव्हेन्टसमध्ये अनेक फिल्मवाले भेटणार, स्टेजवर प्रोग्राम सुरु असताना कॅमेरा कधीही आपल्यावर येणार ( खरं तर तो आपल्यावरच जास्त यावा), हाच शो मग चॅनलवर दाखवणार तेव्हा घराघरात आपण दिसणार, आपले फॅन्स आपल्या फॅशनकडे पाहणार, सोशल मिडियात अशा फोटोंना भरभरून लाईक्स हव्या…. एका इव्हेन्टसमधील आपले असणे/दिसणे/हसणे/पाहणे/बोलणे/ऐकणे हे असे चौफेर महत्वाचे आहे तर मग “पहिले लक्ष्य ग्लॅमर” हा दृष्टिकोन सकारात्मक आहे. ग्लॅमर ही प्रवृत्ती आहे तसेच एक मानसिक गरजही आहे. इतकेच नव्हे तर ‘आपली फॅशन ‘ यावर आता मुलाखतीही असतात आणि सोबत छान फोटो.

आणि हे पहिले लक्ष्य ग्लॅमर आता एकूणच मराठी मनोरंजन विश्वाचा जणू ध्यास अथवा श्वास झालाय. तृप्ती तोरडमल, प्राजक्ता माळी, रसिका सुनील, मिताली मयेकर, शिवानी सुर्वे अशी ही ब्यूटी लिस्ट वाढत जातेय. या प्रत्येकीकडे उत्तम फॅशन सेन्स आहे. आपल्याला काय शोभते हे त्यांना समजतेय. यातील कोणी एकादी फॅशन रिपीट करीत नाही आणि तरीही त्यांच्याकडे नवीन स्टाईल आहे. त्यासाठी त्या गुगल सर्च करीत असतील, फॅशन मॅगझिन चाळत असतील, फॅशन डिझायनरशी व्हॉट्सअॅपवर टचमध्ये असतील, विदेशी चित्रपट पाहत असतील, दुबई/लंडन/सिंगापूरच्या मॉलमध्ये नवीन फॅशनचा शोध घेत असतील… माध्यम कोणतेही असो, पहिले लक्ष्य ग्लॅमर हे सतत अधोरेखित होते. आणि हे करतानाच आपल्यालाच कसे हे सूट होतेय याचा विचार होतानाच आपण काही क्रियेटीव्ह करु शकतो का यावरही लक्ष असेलच. काही झाले तरी ‘कलाकार मन’ आहे ते स्वस्त बसू शकत नाही. आजच्या गतीमान आणि स्पर्धेच्या युगात तर ‘सगळे लक्ष्य आपल्या ‘वर हवे हा कोणाकोणाचा स्वभाव असू शकतो. तो फक्त शाहरूख खानचाच कसा असेल?

मराठी चित्रपटाची इव्हेन्टस संस्कृती बदलत आणि वाढत गेली आणि हे ग्लॅमरचे प्रगती पुस्तक चांगल्या गुणांनी भरु लागले. पूर्वी मराठी चित्रपटसृष्टीच्या सोहळ्यात मराठी अभिनेत्री आवर्जून साडीत येत. आता सोनाली कुलकर्णी ( सिनियर) साडीतील विविध फॅशनला पसंती देतेय. सोशल मिडियात तिचे तसे फोटो लक्षवेधक ठरतात. पूर्वी प्रामुख्याने राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा असे आणि त्यासाठी नामांकनप्राप्त कलाकार तेवढे हजर राहत. जवळपास दीड दशकांपूर्वी काही मिडिया ग्रुप्स, काही चॅनल यांनी अवॉर्डसच्या नामांकनाच्या देर रात तक नाचो पार्ट्या सुरु केल्या, महत्वाचे म्हणजे त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रंगू/नाचू लागल्या, गळामिठी कल्चर आले, त्याचे फोटो वृत्तपत्रात पानभर प्रसिद्ध होऊ लागले. काही वर्षातच विदेशात हेच इव्हेन्टस रंगू लागले…. सर्वच स्तरांवर बदल होत जाताना पहिले लक्ष्य ग्लॅमर हे स्थिरावत गेले. यासाठी लागणारा पैसा आणि फिटनेसही एव्हाना स्वीकारला गेला होताच. मराठी चित्रपटाच्या निर्मितीचे आणि यशाचे अनेकदा तरी कोटीचे कोटी आकडे जाहीर होतात. त्याच्या ब्रेकिंग न्यूज होऊ लागल्या, त्यावरून ‘येथे श्रीमती नांदतेय ‘ असा कोणत्याही सर्वसामान्य रसिकाचा ठाम समज होईलच अथवा झाला आहे. आणि याच आर्थिक सुबत्तेमधून फॅशन फंडा अधिकाधिक ग्लॅमरस होतो. अतिशय नवीन मॉडेलच्या गाडीतून इव्हेन्टसला ये जा करताना ड्रेसही तसाच हायफाय हवा हा सरळ सोपा नियम आहे.

अशा प्रकारच्या ग्लॅमरस रुपड्याची इंग्रजी गॉसिप्स मॅगझिनमधून फारच पूर्वीपासून फोटोसह दखल घेतली जातेय. आणि त्याच कव्हरेजच्या हमीने तेथे केव्हांच ‘पहिले लक्ष्य ग्लॅमर’ हे कल्चर रुजले. मराठीत ते खूप उशीरा आले, पण एक तर जे जे हिंदी चित्रपटसृष्टीत आहे, ते मराठीतही हवेच अथवा सर्वच बाबतीत हिंदी चित्रपटसृष्टीशी स्पर्धा करायचीय तर त्यात हा रंगही हवाच. आपण आपल्या मराठी अभिनेत्रीना त्यांच्या फॅशन फंडाबाबत प्रोत्साहन द्यायला हवे. याचे कारण म्हणजे, प्रत्येक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये असतात तसेच मनोरंजन क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे, प्रेझेन्टटेबल दिसायला हवे. तात्पर्य, आपण कोणत्याही गोष्टीची पाॉझिटीव्ह बाजू पाहिल्याने अशा अनेक गोष्टी स्वीकारणे सोपे जाते. अन्यथा मराठी चित्रपटाची परंपरा पाहता ‘पहिले लक्ष्य ग्लॅमर’ हा फंडा पटकन स्वीकारला जाणे काहीसे अवघड….